Pune Shirur Flyover Project | पुण्यातील वाढती वाहतूक समस्या कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. पुणे ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर देशातील सर्वात लांब उड्डाणपूल उभारण्याची योजना तयार करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या प्रकल्पाची माहिती देताना पुण्यातील अनेक महत्त्वाच्या रस्ते योजनांना मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले.
पुणे-नगर महामार्गावर 31 किमी उड्डाणपूल :
पुणे (Pune) ते अहिल्यानगर (Ahilyanagar) या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात उन्नत मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत पुणे ते शिरूर (Shirur) या दरम्यान सुमारे 53.4 किलोमीटरचा उन्नत मार्ग बांधला जाणार असून त्यासाठी अंदाजे 7,514 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे 31 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल, जो पूर्ण झाल्यानंतर देशातील सर्वात मोठा फ्लायओव्हर ठरणार आहे.
हा सहा पदरी उड्डाणपूल खराडी जंक्शन (Kharadi Junction) ते रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) या दरम्यान उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होईल. सध्या या मार्गावर वाहतुकीचा मोठा ताण असल्यामुळे प्रवाशांना वारंवार कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे हा उन्नत मार्ग पूर्ण झाल्यानंतर वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होण्याची अपेक्षा आहे.
Pune Shirur Flyover Project | दुमजली रस्ता आणि मेट्रो मार्गिका :
या मार्गाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो दुमजली स्वरूपाचा असणार आहे. खराडी ते विठ्ठलवाडी (Vitthalwadi) या सुमारे 7.4 किलोमीटरच्या पट्ट्यात तिहेरी वाहतुकीची व्यवस्था करण्यात येणार आहे. या भागात खालील स्तरावर चौपदरी रस्ता असेल, त्यावर वाहनांसाठी उड्डाणपूल तयार केला जाईल आणि त्याच्यावर मेट्रो मार्गिका उभारण्याची योजना आहे. त्यामुळे भविष्यात सार्वजनिक वाहतूकही अधिक सुलभ होणार आहे.
सध्या पुणे ते शिरूर प्रवास करण्यासाठी साधारण दीड ते पावणे दोन तासांचा कालावधी लागतो. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास केवळ 45 मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. पुढे या उन्नत मार्गाचा विस्तार करून शिरूर ते छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) पर्यंत 192 किलोमीटरचा द्रुतगती मार्ग तयार करण्याचीही योजना आहे. या विस्तारित प्रकल्पासाठी सुमारे 14,886 कोटी रुपये खर्च होणार असून पुणे ते संभाजीनगर प्रवास फक्त दोन तासांत शक्य होईल. (Pune Shirur Flyover Project)
याशिवाय नितीन गडकरी यांनी पुण्यातील इतर काही महत्त्वाच्या प्रकल्पांचीही घोषणा केली आहे. त्यामध्ये तळेगाव (Talegaon) ते चाकण (Chakan) उन्नत मार्ग, चाकण ते शिक्रापूर (Shikrapur) सहा पदरी महामार्ग तसेच पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर (Hadapsar) ते यवत (Yavat) या दरम्यान सुमारे 31.50 किलोमीटर लांबीच्या मार्गाचा समावेश आहे.






