Pune News | पुणे (Pune) शहराच्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी महत्त्वाकांक्षी वर्तुळाकार मार्गाचे (Ring Road) काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून, खडकवासला (Khadakwasla) धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून जाणाऱ्या पश्चिम भागातील मार्गावर ८ पदरी उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. धरणाच्या पाण्यातच खांब उभारून साकारला जाणारा हा पूल अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना ठरणार आहे. (Pune ring road)
पाण्यातच उभारला जातोय ६५० मीटरचा पूल :
पुणे रिंगरोडच्या पश्चिम भागातील सांगरुण (Sangrun) आणि मालखेड (Malkhed) या गावांना जोडण्यासाठी हा सुमारे ६५० मीटर लांबीचा उड्डाणपूल थेट धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बांधला जात आहे. ‘नवयुगा’ (Navayuga) कंपनीमार्फत हे काम एप्रिल महिन्यापासून सुरू करण्यात आले आहे. हा पूल आठ पदरी असणार असून, त्याच्या खांबांमध्ये ४० ते ६० मीटरचे अंतर ठेवण्यात येणार आहे.
या पुलाच्या उभारणीसाठी ‘पाइल फाउंडेशन’ या विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, ज्याद्वारे धरणाच्या पाण्यातच खड्डे घेऊन खांब उभारले जात आहेत. पुलाचे अभियंता रितेश भारद्वाज (Ritesh Bhardwaj) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उड्डाणपुलासाठी एकूण २७६ खड्डे खणले जाणार आहेत. यापैकी १५६ खड्डे जमिनीवर तर १२० खड्डे पाण्यात असतील. आतापर्यंत पाण्यातील १२० पैकी ५९ खड्डे घेण्याचे काम पूर्ण झाले आहे.
रिंगरोडमुळे जोडली जाणार सहा तालुके :
पुण्याचा रिंगरोड पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांमध्ये साकारला जात असून, येत्या अडीच वर्षांत तो पूर्ण करण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) केले आहे. हा मार्ग पुरंदर, हवेली, भोर, खेड, मावळ आणि मुळशी या सहा तालुक्यांतील ८२ गावांमधून जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी तब्बल ५५ हजार ६२२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. (Pune ring road)
हा मार्ग द्रुतगती असल्याने स्थानिक ग्रामस्थांना त्याचा थेट उपयोग होणार नसला तरी, भविष्यात या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्राचे विहंगम दृश्य अनुभवता येणार आहे. ‘एमएसआरडीसी’चे सह व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी नुकतीच पश्चिम रिंगरोडच्या कामाची पाहणी करून कामाला गती देण्याचे आदेश दिले आहेत.






