Nilesh Ghaiwal | कोथरूड परिसरातील कुख्यात गुंड निलेश घायवळच्या (Nilesh Ghaywal) अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुणे पोलिसांनी युनायटेड किंगडमच्या हाय कमिशनला पत्र पाठवत घायवळचा शोध घेऊन त्याला तात्काळ ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी पत्रात घायवळने चुकीच्या प्रक्रियेतून पासपोर्ट मिळवला असल्याचा आरोप केला असून, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे नमूद केले आहे.
या प्रकरणात दोन्ही देशांदरम्यान अधिकृत पत्रव्यवहार सुरू असून पुढील कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, घायवळ सध्या लंडनमध्ये असल्याचे समजते. त्यामुळे त्याच्याविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर अॅक्शन सुरू झाली आहे.
पुणे पोलिसांकडून पासपोर्ट रद्द; खोट्या माहितीचा पर्दाफाश :
गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट बनावट कागदपत्रांवर तयार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने (RPO) गुरुवारी त्याचा पासपोर्ट रद्द केला आहे. घायवळने अर्जामध्ये खोटा पत्ता आणि बदललेले आडनाव नमूद केले होते, अशी माहिती पोलीस उपायुक्त (झोन ३) संभाजी कदम यांनी दिली. तपासात ‘अहिल्यानगर’ हा नमूद केलेला पत्ता अस्तित्वात नसल्याचे समोर आले आहे.
यापूर्वी घायवळ आणि त्याच्या टोळीने १७ ते १८ सप्टेंबरदरम्यान कोथरूड पोलीस स्टेशनजवळ दोन हिंसक हल्ले केले होते. एका प्रकरणात गोळीबार आणि दुसऱ्यात धारदार शस्त्राने मारहाण करण्यात आली होती. या दोन्ही घटनांनंतर पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे नोंदवून ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई केली होती. आतापर्यंत सहा आरोपींना अटक झाली असून घायवळ मात्र विदेशात फरारी आहे.
Nilesh Ghaiwal | खोटा पत्ता, बदललेले आडनाव आणि खोटी प्रतिज्ञापत्र माहिती :
घायवळने पासपोर्ट अर्ज करताना ‘घायवळ’ऐवजी ‘गायवळ’ असे आडनाव वापरून कागदपत्रे सादर केली. त्याने ‘अहिल्यानगर’ परिसरातील पत्त्याचा वापर करून पासपोर्ट मिळवला होता. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर हा पत्ता खोटा असल्याचे उघड झाले.
तपासात आणखी धक्कादायक बाब म्हणजे घायवळने प्रतिज्ञापत्रात स्वतःविरुद्ध कोणताही गुन्हा नोंदलेला नाही, अशी खोटी माहिती दिली होती. यापूर्वी न्यायालयाने त्याला अटींसह जामीन मंजूर करताना पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याने हे आदेश धाब्यावर बसवून देशाबाहेर पलायन केले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.






