Nilesh Ghaiwal | पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचं काऊंटडाऊन अखेर सुरू झालं आहे. कोथरुडमधील गोळीबार आणि हल्ल्याच्या प्रकरणानंतर परदेशात फरार झालेल्या घायवळविरोधात आता पुणे पोलिसांनी मोठं पाऊल उचललं आहे. त्याच्या मुसक्या आवळून भारतात आणण्यासाठी पोलिसांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर हालचाली सुरू केल्या आहेत. (Nilesh Ghaiwal News)
गेल्या काही महिन्यांपासून घायवळ टोळीच्या कारवायांमुळे पुणे हादरलं आहे. कोथरुड परिसरात घडलेल्या गोळीबार आणि कोयता हल्ल्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. पोलिसांनी या प्रकरणात घायवळच्या साथीदारांना अटक केली असली तरी टोळीचा म्होरक्या मात्र परदेशात पळून गेल्याचं स्पष्ट झालं आहे.
परदेशात पळून गेलेला घायवळ, पोलिसांची रेड कॉर्नर नोटीस जारी :
तपासात उघड झालं की, निलेश घायवळने (Nilesh Ghaiwal Passport) बनावट पासपोर्ट वापरून भारतातून पलायन केलं. तो सुरुवातीला लंडनला आणि नंतर स्वित्झर्लंडला गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणानंतर घायवळविरोधात आधीच पाच गुन्हे दाखल झाले आहेत.
आता पुणे पोलिसांनी या कुख्यात गुंडाविरोधात ब्लू कॉर्नर आणि रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. त्यामुळे इंटरपोलच्या मदतीने घायवळला परदेशातून भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर घायवळसाठी सुटकेचे सर्व मार्ग बंद होऊ लागले आहेत.
Nilesh Ghaiwal | घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याची कारवाईही सुरू :
घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी पुणे पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. लवकरच त्यावर सुनावणी होणार असून, पासपोर्ट रद्द झाल्यास घायवळचे परदेशातील वास्तव्य अवघड होईल. दरम्यान, त्याचा भाऊ सचिन घायवळ याच्यावरही मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितलं की, घायवळ टोळीविरोधात आणखी काही गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. या कारवाईनंतर पुणे पोलिसांनी घायवळविरोधातील मोहिम अधिक वेगवान केली आहे.






