पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; पाणीपुरवठा विभागाचा मोठा निर्णय

On: April 28, 2025 2:40 PM
PCMC News
---Advertisement---

Pune News | पुणे शहरात अनेक ठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याचे निदर्शनास आल्याने, पुणे महापालिकेच्या (PMC – Pune Municipal Corporation) पाणीपुरवठा विभागाने कठोर पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी वाया घालवणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, प्रसंगी नळजोडणी तोडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

पाणी नासाडी रोखण्यासाठी कडक पाऊले

शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याच्या टाक्या भरल्यानंतर ओव्हरफ्लो होऊन पाणी वाया जाते, कारण स्वयंचलित कॉक बसवलेले नाहीत. तसेच, अनेक बैठ्या घरांमध्ये आणि वॉशिंग सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्याचा वापर बागकाम, गाड्या धुणे किंवा रस्ता धुण्यासाठी केला जात असल्याचे चित्र आहे. यामुळे पाण्याची प्रचंड नासाडी होत आहे.

या पार्श्वभूमीवर, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप (Nandkishor Jagtap) यांनी सर्व कनिष्ठ अभियंत्यांना पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. पहिल्यांदा असा प्रकार आढळल्यास नोटीस बजावली जाईल. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल आणि तरीही पाणी वाया जात असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता थेट नळजोड तोडण्यात येईल, असे जगताप यांनी सांगितले.

पाणी टंचाईचे संकट

पुणे (Pune) शहरात सध्या पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. दररोज सुमारे दीड लाख नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. महापालिकेची आठ टँकर भरणा केंद्रे असूनही, मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा पडत आहे, ज्यामुळे अनेक भागांना नियमित पाणीपुरवठा करणे कठीण झाले आहे.

पाणीपुरवठा विभाग दर आठवड्याला पाण्याच्या नियोजनाचा आणि तक्रारींचा आढावा घेतो. जुन्या सोसायट्यांमध्ये पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे आता अभियंत्यांना अशा सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन मीटरनुसार पाणीपुरवठा तपासण्याचे आणि वितरण व्यवस्थेतील गळती शोधून ती दुरुस्त करण्यासाठी नोटीस देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

News Title- Pune PMC to Penalize Water Wastage Severely

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now