पुण्यात गुईलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला; सिंहगड रोड, नांदेड, धायरी परिसर हॉटस्पॉट!

On: January 24, 2025 11:21 AM
Pune News
---Advertisement---

Pune News | पुण्यात गुईलेन बॅरी सिंड्रोम (Guillain-Barré Syndrome) या दुर्मिळ आणि गंभीर आजाराने चिंताजनक रूप धारण केले असून, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत 67 हून अधिक रुग्ण आढळून आले असून, त्यातील 70 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण हे सिंहगड रोड, नांदेड गाव, (Nanded Pune) नांदेड सिटी (Nanded City), धायरी (Dhayari), कोल्हेवाडी (Kolhewadi), किरकिटवाडी (Kirkitwadi), शिवणे (Shivane), उत्तमनगर (Uttamnagar), नांदोशी (Nandoshi) आणि खडकवासला (Khadakwasla) या भागांतील आहेत. या पार्श्वभूमीवर, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, या भागातील नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चिंताजनक बाब म्हणजे, या आजाराचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा सिंहगड रोड आणि आजूबाजूच्या परिसरात दिसून येत आहे. या भागातील विहिरी आणि जलस्रोतांमधून येणाऱ्या पाण्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.

महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आणि इतर अधिकाऱ्यांनी नुकतीच नांदेड गावातील विहिरीची पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार, या विहिरीला संरक्षक जाळी बसवण्यात येणार असून, विहिरीच्या पाण्याची नियमित तपासणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

Pune News | गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराची प्राथमिक लक्षणंः

-हाता-पायाला अशक्तपणा येणे

-अचानकपणे चालण्याला त्रास जाणवणे

-अनेक दिवसांपासून डायरियाचा त्रास

या पार्श्वभूमीवर, नांदेड सिटीमधील वर्पे क्लिनिकच्या डॉ. अश्विनी पाटील-वर्पे यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. “नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे. बाहेरचे खाणे टाळावे. विशेषत: उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. फळे आणि भाज्या स्वच्छ धुवून खाव्यात. वैयक्तिक स्वच्छता राखणे अत्यंत महत्वाचे आहे,” असे आवाहन डॉ. पाटील-वर्पे यांनी केले आहे. “हा आजार बरा होतो त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच या आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,” असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

प्रशासनाकडून उपाययोजना:

आरोग्य यंत्रणा या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. रुग्णांच्या परिसरात आरोग्यविषयक सर्वेक्षण केले जात आहे. तसेच, बाधित भागांमध्ये पाण्याच्या नमुन्यांची चाचणी केली जात आहे. काही ठिकाणी जलवाहिन्यांशेजारी सांडपाणी साचत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या भागातील साचलेले पाणी काढून टाकण्याचे आणि आवश्यक त्या ठिकाणी नवीन सांडपाणी वाहिन्या टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now