पुण्यात संस्कार क्लासेसमध्ये १० च्या मुलाने मित्राची केली हत्या, नक्की काय घडलं?

On: December 15, 2025 2:22 PM
pune news
---Advertisement---

Pune News |  पुण्यातील राजगुरुनगर येथे एका खासगी कोचिंग क्लासमध्ये, शिक्षक शिकवत असतानाच एका विद्यार्थ्याने आपल्याच मित्राचा गळा चिरून निर्घृण खून केला आहे. जुन्या वादातून अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये झालेले हे ‘गँगवॉर’ इतके भयंकर होते की, वर्गात सुरू झालेला हल्ला वर्गाबाहेर येऊन संपला आणि उपचारादरम्यान एका निष्पाप विद्यार्थ्याचा जीव गेला. या हत्येमुळे राजगुरूनगर शहरात खळबळ उडाली असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नेमके काय घडले या संस्कार कोचिंग क्लासेसमध्ये? हल्लेखोर अल्पवयीन विद्यार्थी कसा फरार झाला आणि त्याने नंतर पोलिसांपुढे काय कबुली दिली?

नक्की काय घडलं?

दहावीच्या विद्यार्थ्यांचा खासगी क्लास सुरू असताना अचानक विद्यार्थ्यांच्या दोन गटांत जुन्या वादावरून भांडण उफाळले. या वादातूनच एका अल्पवयीन (Pune News) विद्यार्थ्याने रागाच्या भरात आपल्या बॅगेतून धारदार चाकू काढला आणि बेंचवर बसलेल्या मित्र पुष्कर दिलीप शिंगाडे याच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे वर्गात एकच खळबळ उडाली आणि शिक्षकांसह इतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

जीव वाचवण्यासाठी पीडित विद्यार्थी पुष्कर वर्गाबाहेर पळाला. मात्र, हल्लेखोर विद्यार्थ्याने त्याचा पाठलाग सोडला नाही. त्याने क्लासच्या बाहेरच त्याला गाठले आणि अत्यंत क्रूरपणे त्याचा गळा चिरला. हल्ल्यामुळे पुष्कर रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. प्रत्यक्षदर्शी वैभव मटकर यांनी या थराराची माहिती देताना सांगितले की, “ज्यावेळी मी बाहेर आलो, तेव्हा क्लाससमोर खूप विद्यार्थी आणि लोक जमले होते. मॅडमच्या संपूर्ण शरीराला रक्त लागलं होतं आणि हल्ला झालेला मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याच्या मानेला आणि पोटावर वार झाले होते.

विद्यार्थ्याचा कसून शोध सुरू

दरम्यान, उपस्थित नागरिक (Pune News) आणि क्लासचालकांनी तातडीने जखमी विद्यार्थ्याला दुचाकीने खासगी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, पण रुग्णालयाने त्याला दाखल करून घेतले नाही. त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून त्याला सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, अतिरक्तस्राव झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. पोलिसांनी हल्लेखोर विद्यार्थ्याचा कसून शोध सुरू केला.

स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली-

दरम्यान, या घटनेला धक्कादायक कलाटणी मिळाली, जेव्हा हल्ला करणारा विद्यार्थी आणि त्याच्या साथीदाराने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली. दोन्ही अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण अल्पवयीन विद्यार्थ्यांमधील आपसी वाद आणि गँगवॉरचे असावे, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे.

या भयावह घटनेने आता खासगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण केला आहे. अभ्यासासाठी क्लासला गेलेल्या मुलांचा अशा प्रकारे बळी जात असल्याने पालकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

News Title – Pune news rajgurunagar case boy kills friend

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now