Pune News | पुण्यातील सार्वजनिक वाहतूक यंत्रणेत लवकरच मोठा बदल होणार असून पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMP Administration) ने त्यांच्या बस सेवेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशातील प्रवासी वाहतूक व्यवस्थेमध्ये पीएमपी अग्रस्थानी ठरणार आहे.
पीएमपी बसमध्ये नवी व्यवस्था-
पीएमपीने (Pune News) त्यांच्या बसमध्ये एआय आधारित कॅमेरे बसवण्याची योजना आखली आहे. या कॅमेऱ्यांपैकी एक कॅमेरा बसच्या स्टिअरिंगजवळ बसवण्यात येणार आहे, ज्याद्वारे चालकाच्या हालचालींवर आणि वर्तनावर बारकाईने नजर ठेवता येणार आहे. काही अपघात चालकांच्या चुकीमुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे, तसेच अनेक चालक वाहतूक नियम पाळत नसल्याचाही अनुभव प्रशासनाने घेतला आहे. या सर्व कारणांमुळे चालकांच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी एआय कॅमेऱ्यांचा उपयोग होणार आहे.
तसेच, पीएमपीच्या बसेसने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. काही प्रवासी गर्दीचा फायदा घेत विनातिकीट प्रवास करतात. एआय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांची संख्या नोंदवली जाणार असून ती माहिती थेट वाहकापर्यंत पोहोचवली जाईल. यामुळे विनातिकीट प्रवासावर नियंत्रण ठेवता येणार आहे.
प्रस्ताव तयार; पाच कोटी खर्च अपेक्षित
या नव्या प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी पीएमपी (Pune News) प्रशासनाने एक सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस यासंदर्भात पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नवी दिल्ली येथे बैठक घेण्यासाठी बोलावण्यात आले आहे. तेथे एआय तंत्रज्ञान बसमध्ये बसवण्याबाबत सादरीकरण केले जाणार आहे.
या योजनेसाठी एकूण अंदाजे पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एकदा केंद्र शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर, पीएमपीच्या सर्व बसेसमध्ये एआय कॅमेरे बसवले जातील. त्यामुळे पुण्यातील प्रवासी वाहतुकीत सुरक्षेचा आणि पारदर्शकतेचा एक नवा अध्याय सुरू होणार आहे.






