Pune News | पुण्यात वाढती पाणीटंचाई लक्षात घेता महापालिकेच्या (PMC) पाणीपुरवठा विभागाने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी नासाडी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह नळजोडणी तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Pune News)
PMC ची कारवाई
पुणे शहरात अनेक ठिकाणी पाण्याचा अनाठायी वापर, ओव्हरफ्लो होणाऱ्या टाक्या, पाइपलाइनमधून गळती आणि गैरप्रकारामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आले आहे. घरगुती वापरापेक्षा अधिक प्रमाणात पिण्याचे पाणी बागकाम, गाड्या धुणे, वॉशिंग सेंटर्स आणि रस्ते स्वच्छतेसाठी वापरले जात असल्याने संकट अधिक तीव्र झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. नियम मोडणाऱ्यांना प्रथम नोटीस देण्यात येईल, सुधारणा न झाल्यास दंड आकारला जाईल आणि शेवटी नळजोडणीही तोडण्यात येईल. त्यांच्या म्हणण्यानुसार, “पाणी वाचवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, मनपा कठोर पावले उचलून पाणीसंवर्धन सुनिश्चित करणार आहे.”
पाणीटंचाईची गंभीर स्थिती
सध्या पुण्यात सुमारे 1.5 लाख नागरिकांना टँकरच्या माध्यमातून पिण्याचे पाणी मिळत आहे. पीएमसीकडे आठ टँकर भरणा केंद्रे असूनही वाढत्या मागणीमुळे पुरवठा अपुरा ठरत आहे. जुन्या सोसायट्यांमध्ये अनियमित पाणीपुरवठा आणि गळतीच्या तक्रारी सतत वाढत आहेत. पुणे विभागातील धरणांत केवळ 30% पाणीसाठा शिल्लक असून, मागील 15 दिवसांत साठ्यात 5% घट झाली आहे.
पाणीपुरवठा विभागाकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे. अभियंत्यांना सोसायट्यांमध्ये भेटी देऊन मीटरनुसार वापर तपासणे, गळती शोधणे आणि दुरुस्तीबाबत नोटीस देण्याचे आदेश दिले आहेत. सर्व सोसायट्यांना पाईपलाइन, टाक्या आणि नळांची स्थिती तपासून दुरुस्ती करण्यास सांगण्यात आले आहे. (Pune News)
नंदकिशोर जगताप यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वाढत्या उन्हाळ्यात पाण्याची मागणी मोठी आहे आणि त्यामुळे प्रत्येकाने पाणी जपून व काटकसरीने वापरणे अत्यावश्यक आहे. “खडकवासला धरणातून मासिक 1.5 TMC पाणी घेतले जाते. जर पाणीसाठा टिकवायचा असेल, तर पाण्याचा अपव्यय थांबवणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.
Title : Pune News Fine Water Wasters, May Cut Connections






