Pune News | मागील काही दिवसांपासून कोथरूड आणि बावधन परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दूषित पाण्यामुळे अनेक नागरिकांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होत आहे. दसऱ्यानंतर या परिसरातील पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर घरांमध्ये दूषित आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होऊ लागला. याच दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या असून, गेल्या दहा दिवसांपासून नागरिक त्रस्त आहेत.
परिसरातील उजवी भुसारी कॉलनी, डावी भुसारी कॉलनी, इंदिरा शंकरनगरी, वेदभवन परिसर, सौदामिनी, मोकाटेनगर या भागांतील शेकडो नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य व पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भुसारी कॉलनी परिसरात ठिकठिकाणी पाहणी केली. तसेच, पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठविले आहेत. (Kothrud Dirty Water Crisis)
महापालिकेचे दुर्लक्ष?
स्थानिक नागरिकांनी पाणी गढूळ येत असल्याची तक्रार महापालिकेकडे केली होती. मात्र, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे. “जवळपास नव्वद टक्के नागरिकांना उलटी, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होत आहे,” असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिकेचे अधिकारी पाण्याचे नमुने घेऊन गेलेत; मात्र अद्याप त्यांच्याकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत, असेही ते म्हणाले.
महापालिकेने पिण्याचे पाणी वीस मिनिटे उकळून थंड करूनच पिण्याचे तसेच योग्य औषधोपचार घ्यावे, असे आवाहन केले आहे. मागील काही दिवसांपासून आरोग्याच्या तक्रारी घेऊन नागरिक येत होते. सध्या रुग्णसंख्या काहीशी कमी झाली आहे. पाण्यामुळेच नागरिकांना त्रास होत असल्याचे निश्चित झाले आहे, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Kothrud Dirty Water Crisis)
Pune News | महापालिकेच्या दवाखान्यांत औषधोपचार
कोथरूड येथील सुतार रुग्णालय, बावधन येथील वेडेपाटील रुग्णालय, उजवी भुसारी कॉलनी येथील वीर सावरकर दवाखाना आणि शांतिबन सोसायटी येथील महापालिकेच्या दवाखान्यांत औषधोपचार दिले जात आहेत. दूषित पाण्यामुळे नागरिकांना विविध त्रासांना सामोरे जावे लागत आहे. पाण्याचे नमुने तपासले असता पाणी दूषित असल्याचे निष्पन्न झाले आहे. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी पाणीपुरवठा वाहिनीची तपासणी करत आहेत. (Kothrud Dirty Water Crisis) बावधन आणि उजवी भुसारी कॉलनी परिसरातील अनेक नागरिक विविध रुग्णालयांत दाखल झाले आहेत. काही नागरिकांना खोकला, थंडी आणि ताप याचा त्रास देखील जाणवत आहे.
News Title- pune news dirty water crises in kothrud






