Pune News | पुणेकरांना शुद्ध पाण्याच्या नावाखाली अशुद्ध आणि आरोग्यास धोकादायक पाणीपुरवठा करणाऱ्या तब्बल १९ ‘रिव्हर्स ऑस्मोसिस’ (आरओ) प्रकल्पांना महापालिकेने दणका देत टाळे ठोकले आहे. किरकटवाडी, नांदेड, नांदोशी परिसरातील तब्बल ३० ‘आरओ’ प्रकल्पांची तपासणी केल्यानंतर त्यापैकी १९ प्रकल्पांतील पाण्यात ‘कॉलिफॉर्म’ जीवाणू आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. (Pune News )
‘जीबीएस’चा धोका वाढण्याची भीती
या अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांमध्ये ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) सारखा गंभीर आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले आहेत.
तपासणीत काय आढळले?
महापालिकेने केलेल्या तपासणीत धक्कादायक बाबी समोर आल्या. अनेक खासगी पाणीपुरवठादारांच्या टँकरच्या पाण्यातही ‘कॉलिफॉर्म’ जीवाणू आढळून आला होता. त्यामुळे टँकरमध्ये ‘ब्लिचिंग पावडर’ टाकून पाण्याचा पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय परिसरातील ३० ‘आरओ’ प्रकल्पांतील पाण्याची तपासणी केली असता १९ ठिकाणी ‘कॉलिफॉर्म’ जीवाणू आढळून आले.
शुद्ध पाणी की निव्वळ धंदा?
शहरातील अनेक कार्यालये, उपनगरांतील अनेक घरांमध्ये २० लिटरच्या ‘जार’मधून पिण्याचे पाणी विकत घेतले जाते. मात्र, हे ‘आरओ’ प्रकल्प शुद्ध पाण्याच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे या कारवाईतून उघड झाले आहे. (Pune News )
नियमावली बनवणार
महापालिकेने या १९ ‘आरओ’ प्रकल्पांना टाळे ठोकले असून, या प्रकल्पांसाठी एक नियमावली तयार करण्यात येत आहे. या नियमावलीची अंमलबजावणी केल्यास संबंधितांचे प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल, असेही पृथ्वीराज बी.पी. यांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांनो, सतर्क राहा!
या प्रकारानंतर नागरिकांनी विकतचे पाणी घेताना सतर्क राहण्याची गरज आहे. पाणी घेण्यापूर्वी संबंधित ‘आरओ’ प्रकल्पाची विश्वासार्हता तपासून पाहणे आवश्यक आहे.
Title: Pune News 19 RO Plants Sealed in Pune for Supplying Contaminated Water






