Pune Murder | पुणे पुन्हा एकदा रक्तरंजित गुन्ह्याने हादरले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात बाजीराव रोडवर भरदिवसा एका 17 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन दिवसांत ही दुसरी खुनाची घटना असून शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
बाजीराव रोडवर थरार — धारदार शस्त्राने वार करून हत्या :
मिळालेल्या माहितीनुसार, मयंक खराडे (वय 17) हा तरुण आपल्या मित्र अभिजीत इंगळेसह दुचाकीवरून जात असताना, महाराणा प्रताप उद्यानाजवळील दखनी मिसळसमोर तिघा तरुणांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला.
या तिघा आरोपींनी तोंडावर मास्क लावलेले होते आणि त्यांनी मयंकच्या डोक्यावर व तोंडावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात मयंकचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला असून परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Pune Murder | आंदेकर टोळीचा संदर्भ आणि वाढता गुन्हेगारीचा ग्राफ :
पुण्यात गेल्या काही दिवसांत आंदेकर टोळीच्या गुन्ह्यांमुळे शहरात दहशतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी गणेश काळे हत्याकांडाने शहर हादरले होते, आणि आता मयंक खराडेच्या खुनाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुन्ह्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र प्राथमिक तपासात गॅंग वाद किंवा जुनी शत्रुत्वाची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
पोलिसांचा तपास सुरू — आरोपींचा शोध तीव्र :
या हत्येनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली असून, जनता वसाहतीतील संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. शहरातील पोलिस दलाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचले असून शस्त्र आणि पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिला आहे. पुण्यातील वाढत्या गॅंग वादांवर पोलिस नियंत्रण ठेवू शकतील का?






