पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, तर ‘या’ माजी आमदाराच्या पत्नीचा पराभव

On: January 16, 2026 5:50 PM
sonali andekar
---Advertisement---

Pune Municipal Corporation Result | पुणे महानगरपालिका निवडणूक निकालात मोठा धक्का बसला असून प्रभाग क्रमांक २३ मधून आंदेकर कुटुंबाच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या तिकिटावर लढलेल्या सोनाली आंदेकर विजयी ठरल्या असून, शिवसेना नेते व माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव झाला आहे. या निकालामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी गुरुवारी मतदान झाले होते आणि आज निकाल जाहीर झाले. पुण्यातील प्रभाग क्रमांक २३ विशेष चर्चेत होता कारण आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. दोघींनीही तुरुंगातूनच निवडणूक लढवली होती. निकालात सोनाली आंदेकरसह लक्ष्मी आंदेकर विजयी झाल्या असून, या प्रभागातील एक जागा राष्ट्रवादीला तर उर्वरित तीन जागा भाजपला मिळाल्या आहेत.

तुरुंगातून लढवलेली निवडणूक, निकालानंतर वादंग :

सोनाली आंदेकर (Sonali Andekar) या हत्या झालेल्या वनराज आंदेकर यांच्या पत्नी असून आयुष कोमकर (Ayush komkar) हत्या प्रकरणात त्या आरोपी आहेत. लक्ष्मी आंदेकर यांच्यावरही गंभीर गुन्ह्यांचे आरोप असून दोघी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र प्रचारादरम्यान मिरवणूक, भाषण आणि घोषणाबाजीवर न्यायालयाने निर्बंध घातले होते. (Pune Municipal Corporation Result)

या विजयानंतर पुण्यात गुन्हेगारी कमी होईल की वाढेल, असा सवाल उपस्थित केला जात आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील उमेदवारांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आल्याने आधीच राजकीय वाद निर्माण झाला होता. भाजप नेत्यांनी यावर तीव्र टीका केली होती, तर अजित पवार यांच्या “पुणे गुन्हेगारीमुक्त करेन” या वक्तव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

Pune Municipal Corporation Result | रवींद्र धंगेकरांच्या पत्नीचा पराभव, राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता :

या प्रभागातून शिवसेना नेते व माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर (Pratibha Dhangekar) निवडणूक रिंगणात होत्या. मात्र आंदेकर कुटुंबाच्या उमेदवारांसमोर त्यांना पराभव स्वीकारावा लागला. हा निकाल पुण्यातील स्थानिक राजकारणात मोठा बदल घडवणारा ठरण्याची शक्यता असून आगामी काळात याचे पडसाद राज्य पातळीवरही उमटू शकतात.

महापालिका निवडणुकीतील हा निकाल केवळ एका प्रभागापुरता मर्यादित न राहता, गुन्हेगारी आणि राजकारण यातील संबंधांवर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू करण्यास कारणीभूत ठरत आहे. आता प्रशासन आणि राजकीय पक्ष या निकालाकडे कसे पाहतात आणि पुढील रणनीती काय आखतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Title: Pune Municipal Corporation Result 2026: Andekar Gang Candidate Wins, Ravindra Dhangekar’s Wife Defeated

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now