Pune News | पुणे महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तीचा कळस गाठला असून, कार्यालयीन वेळेचे उल्लंघन होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने अनेक कर्मचारी दोन तास उशिरा येऊन कार्यालयीन वेळ संपण्याच्या दोन तास आधीच घरचा रस्ता धरत आहेत, ज्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
वेळेचे बंधन कागदावरच
शासनाच्या नियमानुसार, पुणे महानगरपालिकेची (Pune Municipal Corporation) कार्यालयीन वेळ सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ अशी निश्चित करण्यात आली आहे. अनेक अधिकारी आणि कर्मचारी सकाळी ११:३० ते १२ च्या दरम्यान कामावर येतात आणि सायंकाळी ४ वाजल्यापासूनच घरी जाण्याच्या तयारीत असतात.
कामचुकारपणाला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेली बायोमेट्रिक हजेरीची प्रणालीदेखील कुचकामी ठरली आहे. काही काळापूर्वी बायोमेट्रिक वेळेनुसार वेतन कापण्याच्या इशाऱ्यामुळे कर्मचारी वेळेवर येत होते. मात्र, आता ती प्रणालीच बंद असल्याने कर्मचाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे. वरिष्ठांना कोणतीही कल्पना न देता अनेक जण दिवसभर कार्यालयातून गायब असतात.
नागरिकांची गैरसोय
कार्यालयात कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्याने कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना ताटकळत बसावे लागते. अनेकदा अधिकारी त्यांच्या खुर्चीत सापडत नाहीत, ज्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. सध्या पालिकेत प्रशासक राजवट असल्याने आणि लोकप्रतिनिधी नसल्याने कर्मचाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही.
पालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीमधील अनेक कार्यालये बंद असल्याने त्या मजल्यांचा वापर महिला कर्मचाऱ्यांकडून जेवणानंतर फिरण्यासाठी ‘वॉकिंग प्लाझा’ म्हणून केला जात आहे. शिस्तप्रिय म्हणून ओळख असलेल्या पालकमंत्र्यांच्याच शहरातील पालिकेत अशी बेशिस्त सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत असून, त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून अचानक पाहणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.






