Maharashtra Weather Alert | डिसेंबरच्या मध्यात राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांत जाणवणारी कडाक्याची थंडी आता काहीशी ओसरली असून, अनेक भागांत तापमानात चढ-उतार दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मंगळवार, 16 डिसेंबरसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज जाहीर केला आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा प्रभाव कमी झाल्याने राज्यात सध्या थंडीचा जोर घटल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. बहुतांश भागांत हवामान कोरडे राहणार असून सकाळी हलका गारवा आणि दुपारी तुलनेने उबदार वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई, पुण्यात थंडीचा जोर कमी :
मुंबई, पालघर (Palghar Weather) आणि कोकण किनारपट्टी भागांत आज सकाळी हलका गारवा जाणवणार असला, तरी किमान तापमान 20 ते 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सोमवारी नोंदवलेल्या तापमानाच्या तुलनेत येथे सुमारे एक अंशांची वाढ झाली आहे. दिवसा कमाल तापमान 32 अंशांच्या आसपास जाणार असून दुपारच्या वेळेत उन्हाची तीव्रता जाणवू शकते.
पुणे शहरातही (Pune Weather Update) थंडीचा जोर कमी झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. आज सकाळी किमान तापमान 14 ते 15 अंशांच्या दरम्यान नोंदवण्यात आले असून, मागील आठवड्यातील गारठ्यापेक्षा हवामान अधिक उबदार आहे. दिवसा तापमान 30 अंशांच्या आसपास राहणार असून पुढील दोन दिवसांत पुण्यात हवामान कोरडेच राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
Maharashtra Weather Alert | मराठवाडा, विदर्भात हवामान स्थिर; पुढील काही दिवस कोरडे :
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही आज हवामान स्थिर राहणार आहे. काही भागांत रात्रीचे तापमान 12 ते 15 अंशांपर्यंत खाली जाण्याची शक्यता असली, तरी दिवसा तापमानात वाढ होईल. त्यामुळे सकाळी आणि रात्री थंडी जाणवेल, मात्र दिवसा उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Alert)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील बहुतांश भागांत हवामान कोरडेच राहणार आहे. किमान तापमान 12 ते 22 अंशांदरम्यान, तर कमाल तापमान 30 ते 33 अंशांच्या आसपास राहील. हिवाळा सुरू असला तरी सध्या तरी कडाक्याची थंडी जाणवणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.






