Pune-Mumbai ST Bus | पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपेलिन गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याने महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या परिस्थितीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. (Pune-Mumbai ST Bus)
या अपघातामुळे गेल्या २० तासांपासून महामार्गावर तब्बल ३० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून, अनेक प्रवासी आणि चालक तासन्तास अडकून पडले आहेत. अनेक एसटी बसेसही या कोंडीत अडकल्या असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढील बससेवा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महामार्गावर परिस्थिती गंभीर :
मुंबईकडे जाणारी एक लेन आणि पुण्याकडे येणाऱ्या दोन लेन अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. जुन्या मुंबई–पुणे महामार्गावरही वाहतूक विस्कळीत झाली आहे. महामार्ग पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला असून, प्रवास करताना पाणी आणि आवश्यक अन्न सोबत ठेवण्याचे आवाहन केले आहे. (Pune-Mumbai ST Bus)
या अपघातामुळे शेकडो वाहने रस्त्यावर अडकली असून, अनेक प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत पुणे-मुंबई मार्गावरील प्रवास टाळण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
Pune-Mumbai ST Bus | गॅस लिकेज सुरूच; वाहतूक कधी सुरळीत होणार अस्पष्ट :
अपघातग्रस्त टँकरमधून अद्यापही गॅस लिकेज सुरू असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू असून, ती पूर्ण झाल्यानंतरच टँकर हटवता येणार आहे. त्यानंतरच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे. (Pune Mumbai ST bus cancelled)
मात्र, ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी नेमका किती वेळ लागेल हे अद्याप स्पष्ट नसल्याने प्रवाशांनी आणि वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे पुन्हा एकदा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.






