Pune Crime | पुणे जिल्ह्यातील खेड (Khed) तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. शेजारी राहणाऱ्या एका नराधमाने कॉलेजमधून घरी परतणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला (Minor student) लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नेऊन, तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करत तिची हत्या केली आणि मृतदेह भीमा नदीत (Bhima river) फेकून दिला. या घटनेमुळे परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
विश्वासघात आणि निर्घृण हत्या
खेड तालुक्यातील रहिवासी आणि हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात (Hutatma Rajguru Mahavidyalaya) शिकणारी ही पीडित मुलगी ११ एप्रिल (April 11) रोजी कॉलेज सुटल्यावर घरी जाण्यासाठी पाबळ रोडवर थांबली होती. त्याचवेळी तिच्याच गावातील आणि घराजवळ राहणारा आरोपी नवनाथ मांजरे (Navnath Manjare) तेथे आला. त्याने ‘घरी सोडतो’ असे सांगून तिला आपल्या दुचाकीवर बसवले. ओळखीचा असल्याने तिने विश्वास ठेवला.
मात्र, वाटेत आरोपीने उसाला पाणी देण्याचे निमित्त करून तिला नदीकाठच्या शेतात नेले. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केला असता, आरोपीने रागाच्या भरात शेतातील दगडाने तिच्या डोक्यात प्रहार करून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात फेकून दिला.
आरोपीचा बनाव आणि पोलिसांचा तपास
मुलगी घरी न परतल्याने शोध सुरू झाला. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV footage) ती आरोपी नवनाथ मांजरेच्या दुचाकीवर दिसली. त्यानंतर तिचा मृतदेह नदीपात्रात सापडला. आरोपी मात्र गावात काहीच घडले नसल्यासारखा वावरत होता, त्याने यात्रेलाही हजेरी लावली होती आणि दुसऱ्या दिवशी हनुमान जयंतीला (Hanuman Jayanti) दुकानात नारळही विकत होता. त्याने गावात उलटसुलट माहिती पसरवून दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे नवनाथ मांजरेला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. त्याला सध्या आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, लैंगिक अत्याचार झाला होता का, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. पीडितेच्या मोठ्या बहिणीचा साखरपुडा १३ एप्रिलला असल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला होता.
Title : Pune Minor Girl Murdered by Neighbor After Accepting Lift Offer






