Pune MHADA Lottery | पुणे, पिंपरी-चिंचवडसह सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील म्हाडाच्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो नागरिकांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाअंतर्गत विविध प्रकल्पांतील 4,186 सदनिकांची संगणकीय सोडत मंगळवार, 10 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता काढली जाणार आहे. त्यामुळे लाखो अर्जदारांचे लक्ष आता उद्याच्या या ‘जॅकपॉट’कडे लागले आहे. (Pune MHADA Lottery)
ही सोडत पुणे जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात पार पडणार असून, पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते ती काढण्यात येईल. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल हे मुंबईहून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाणार असल्याची माहिती म्हाडा प्रशासनाने दिली आहे.
अर्जदारांचा प्रचंड प्रतिसाद, चुरशीची स्पर्धा :
या सोडतीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून एकूण 4,186 घरांसाठी तब्बल 2,58,832 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 2,15,965 अर्जदारांनी वेळेत अनामत रक्कम (EMD) भरल्यामुळे केवळ त्यांनाच अंतिम सोडतीत सहभागी होता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक घरासाठी शेकडो अर्जदार रिंगणात असल्याने स्पर्धा अधिक चुरशीची ठरणार आहे. (Pune MHADA Lottery)
पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्र तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील 3,322 सदनिका आणि 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील 864 सदनिकांचा या सोडतीत समावेश आहे. अर्जदारांच्या मागणीनुसार काही तांत्रिक अडचणी आणि निवडणूक आचारसंहितेमुळे अर्ज भरण्याच्या मुदतीस दोनदा वाढ देण्यात आली होती.
Pune MHADA Lottery | घरबसल्या पाहता येणार थेट सोडत :
ज्या अर्जदारांना प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणे शक्य नाही, त्यांच्यासाठी म्हाडाने ऑनलाईन थेट प्रक्षेपणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.
अर्जदारांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लिंक पाठवण्यात आली असून, म्हाडाच्या अधिकृत YouTube चॅनेलवर दुपारी 12 वाजल्यापासून ही सोडत थेट पाहता येणार आहे. पारदर्शक प्रक्रियेमुळे सर्व अर्जदारांना निष्पक्ष निकालाची अपेक्षा आहे.






