पुण्यात म्हाडाचं घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी; अवघ्या 28 लाखात मिळणार घरं

On: November 5, 2025 4:48 PM
MHADA Pune Lottery
---Advertisement---

Pune MHADA Lottery | पुण्यात राहण्याचं स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. कारण म्हाडा (MHADA) पुणे मंडळाकडून पुन्हा एकदा अल्प दरात घर खरेदी करण्यासाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. या योजनेत पुण्यातील प्रमुख ठिकाणी 90 लाख रुपये किंमतीची घरे अवघ्या 28 लाखांत मिळणार आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीयांना घर खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी ठरणार आहे. (Pune MHADA Lottery)

म्हाडाची पुण्यातील नवी गृहलॉटरी :

म्हाडाच्या पुणे मंडळाने जाहीर केलेल्या या लॉटरीमध्ये एकूण 4186 घरांचा समावेश आहे. त्यापैकी 1982 घरे “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या योजनेअंतर्गत विक्रीसाठी खुली करण्यात आली आहेत. या लॉटरीत 80 ते 90 लाखांच्या घरांच्या तुलनेत 28 लाखांत मिळणारी घरे ही सर्वाधिक आकर्षणाचा विषय ठरत आहेत. (Pune MHADA Lottery 2025)

ही घरे हिंजवडी आणि वाकड परिसरात असणार असून ‘यश्विन अर्बो सेंट्रो’ या प्रकल्पात ही घरे बांधण्यात आली आहेत. त्यांची किंमत 28.42 लाखांपासून ते 28.74 लाख रुपयांपर्यंत आहे. या परिसरातील इतर घरांच्या तुलनेत ही किंमत अत्यंत परवडणारी असल्याने अर्जदारांमध्ये मोठी उत्सुकता दिसत आहे.

Pune MHADA Lottery | अर्ज कसा करायचा आणि शेवटची तारीख कोणती? :

म्हाडाच्या या लॉटरीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली आहे. इच्छुक अर्जदारांनी housing.mhada.gov.in या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन अर्ज भरायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2025 असून, त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अर्जदारांना ऑनलाईन अनामत रकमेचा भरणा 20 नोव्हेंबर रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत करता येईल. तर 21 नोव्हेंबरपर्यंत RTGS किंवा NEFT द्वारे भरणा स्वीकारला जाणार आहे. अर्ज प्रक्रियेसंबंधी सर्व माहिती, दर, घरांची यादी आणि अटी नियम म्हाडाच्या वेबसाइटवरील Pune MHADA Lottery 2025 notification PDF मध्ये पाहता येतील.

संगणकीय सोडत 11 डिसेंबरला :

सुधारित वेळापत्रकानुसार, या गृहलॉटरीची संगणकीय सोडत 11 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता काढण्यात येणार आहे. पुणे मंडळाच्या या सोडतीत म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेतील 1683 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 299 सदनिका, तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील 4086 सदनिकांचा समावेश आहे.

पुण्यात वाढत्या घरांच्या किंमतींमुळे अनेकांना स्वतःचं घर घेणं कठीण झालं आहे. अशा वेळी म्हाडाच्या या योजनेमुळे सामान्य नागरिकांना त्यांच्या स्वप्नातील घराचा मालक होण्याची एक सुवर्णसंधी लाभली आहे.

News Title: Pune MHADA Lottery 2025: Buy a ₹90 Lakh Flat for Just ₹28 Lakh — Know How to Apply and Last Date

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now