Pune Metro News | पुण्यातील महत्त्वाकांक्षी निगडी–चाकण ( Nigdi Chakan Metro) मेट्रो मार्गाच्या आराखड्यात मोठा बदल केला जात असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड आणि चाकण या औद्योगिक पट्ट्यांना मेट्रोने जोडण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा महामेट्रोकडून सुधारित केला जात आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या विविध मागण्यांचा विचार करून नवीन आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.
महामेट्रोमधील मिळालेल्या माहितीनुसार, सुधारित आराखड्याचा अंतिम अहवाल पुढील महिनाभरात सादर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या मार्गावर काही नवीन गावे, चौक आणि अतिरिक्त स्टेशनांचा समावेश केला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे औद्योगिक तसेच निवासी भागांतील नागरिकांना मेट्रो सुविधा आणखी सुलभ होणार आहे.
आणखी काही गावे जोडण्याची शक्यता :
सध्या पुण्यात पिंपरी ते स्वारगेट या मार्गावर मेट्रो धावत असून, त्याचा विस्तार निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत केला जात आहे. यानंतरच्या टप्प्यात भक्ती-शक्ती चौक ते चाकण दरम्यान स्वतंत्र मेट्रो मार्गाचा आराखडा प्रस्तावित करण्यात आला होता. जुन्या आराखड्यानुसार हा मार्ग पूर्णपणे एलिव्हेटेड असून 31 स्टेशनांचा समावेश होता.
यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील 25 आणि चाकण परिसरातील 6 स्टेशनांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, आता या मार्गात आसपासची आणखी काही गावे जोडण्याची शक्यता आहे. नवीन स्टेशन जोडले गेल्यास या मेट्रो मार्गाद्वारे औद्योगिक क्षेत्रातील कामगार, विद्यार्थी आणि दैनिक प्रवाशांना मोठी सुविधा मिळणार आहे.
Pune Metro News | सुधारित आराखड्यात नवीन गावे आणि स्टेशनांचा समावेश :
महामेट्रो सुधारित आराखड्यात काही महत्त्वाच्या चौकांचा व गावे यांचा समावेश करण्यावर अभ्यास करत आहे. यामुळे प्रकल्पाचा एकूण खर्च वाढू शकतो. आधी सांगितलेल्या अंदाजपत्रकानुसार प्रकल्पाचा खर्च 10,383 कोटी 89 लाख रुपये होता. मार्गाची लांबी वाढल्यास किंवा स्टेशनांची संख्या वाढल्यास खर्चात वाढ अपरिहार्य आहे. ( Nigdi Chakan Metro)
या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी 10 टक्के निधी देणार आहेत, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वाटा 15 ते 20 टक्क्यांदरम्यान असेल. उर्वरित 60 टक्के निधी कर्जातून उभारला जाणार आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, “प्राथमिक आराखड्यावर आलेल्या सूचनांनुसार सुधारित आराखड्याचे काम सुरू आहे. नवीन गावे किंवा स्टेशनांचा समावेश झाला तर प्रकल्पाच्या खर्चात वाढ अपेक्षित आहे.” (Pune Metro News)
या विस्तारित प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवड आणि चाकण औद्योगिक क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारेल. तज्ज्ञांच्या मते, या मार्गामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि हजारो प्रवाशांचा वेळ वाचेल.






