Pune Metro | पुणेकर आणि वारकरी संप्रदायासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. पुणे मेट्रोचा विस्तार आता आळंदीपर्यंत होणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधिस्थळापर्यंत मेट्रो सेवा उपलब्ध झाल्याने लाखो भाविकांना प्रवास अधिक सोपा, जलद आणि सुरक्षित होणार आहे.
आळंदी मेट्रो विस्ताराचा निर्णय :
लोहगाव ते आळंदी या मेट्रो लाईनच्या प्रस्तावावर मागील आठवड्यात महा-मेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर यांच्यासोबत चर्चा झाली होती. यावेळी विस्ताराचा प्राथमिक आराखडा तयार करण्याचे सूचित करण्यात आले. माजी नगरसेवक अनिल टिंगरे यांनी याबाबत पत्र दिले होते. त्यानुसार केंद्र सरकारचे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आळंदीपर्यंत मेट्रो विस्ताराचा निर्णय जाहीर केला. (Alandi Metro Project)
मोहोळ म्हणाले की, आळंदी हे वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी महाराष्ट्रभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या भाविकांसाठी मेट्रो हा मोठा दिलासा ठरणार आहे.
Pune Metro | नागरिकांच्या सोयीसाठी उपाययोजना :
विश्रांतवाडी येथे झालेल्या खासदार जनसंपर्क अभियानात या निर्णयाची माहिती देण्यात आली. यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार जगदीश मुळीक, तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. लोहगाव-धानोरी परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण, डीपीआर, मिसिंग लिंक, तसेच डिफेन्स क्षेत्रातील परवानग्यांच्या समस्या यावरही चर्चा झाली. ( Pune Metro Alandi Expansion)
मोहोळ यांनी स्पष्ट केले की, डिफेन्स परिसरातील अडचणी दूर करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. तसेच पुणे विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा कॅबिनेटसमोर ठेवण्यात आला असून लवकरच निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.
News Title: Pune Metro Expansion: Alandi to Get Metro Connectivity Soon, Big Relief for Devotees of Sant Dnyaneshwar






