Pune Rain School Holiday | पुणे शहरात रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीची गती मंदावली आहे. काही ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शहरातील अनेक शाळांनी आज (१५ सप्टेंबर २०२५) सुट्टी जाहीर केली आहे. (Pune Rain School Holiday)
हडपसरसह अनेक भागांतील शाळा बंद :
हडपसर परिसरातील बहुतेक शाळांनी पावसामुळे विद्यार्थ्यांना सुट्टी दिली आहे. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर मोठी कोंडी निर्माण झाली असून, विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून शाळा व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पालकांनाही दिलासा मिळाला आहे.
पावसाची तीव्रता कायम राहिल्याने पुढील काही तास अशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पुणे महानगरपालिका व प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. शहरातील पाणी साचलेल्या भागांत आपत्कालीन सेवांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Pune Rain School Holiday | हवामान खात्याचा इशारा :
भारतीय हवामान विभागाने पुणे, सोलापूर, बीड आणि अहिल्यानगर या भागांसाठी पुढील तीन तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या काळात ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे, विजांचा कडकडाट आणि गडगडाटी वादळ होण्याची शक्यता आहे. (Pune Rain School Holiday)
मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई, लोणावळा, खंडाळा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या भागांतही पावसाची तीव्रता वाढली आहे. मुंबईसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यात पुन्हा अति मुसळधार पावसाचा धोका असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.






