Nilesh Ghaywal | पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) प्रकरणात एका महिलेची एंट्री झाली आहे. या महिनेले घायवळवर गंभीर आरोप केले आहेत. घायवळ आणि त्याच्या टोळीने एका महिला उद्योजिकेला लक्ष्य करत लाखोंची खंडणी उकळल्याचे उघड झालं आहे. कर्वेनगर (Karvenagar) आणि शिवणे (Shivane) परिसरातील शाळांना सेवा पुरवणाऱ्या या महिलेकडून तब्बल ४४ लाख रुपये उकळण्यात आले. या प्रकरणी निलेश, त्याचा भाऊ सचिन घायवळ (Sachin Ghaywal) आणि एका क्रीडा शिक्षकासह एकूण १३ जणांविरुद्ध वारजे माळवाडी (Warje Malwadi) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बनावट डेअरीचा बहाणा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४० वर्षीय पीडित महिला आपल्या कंपनीमार्फत कर्वेनगर आणि शिवणे भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ आणि वाहतूक सेवा पुरवतात. शाळेतील ओळखीचा फायदा घेत, कर्वेनगरमधील एका शाळेतील क्रीडा शिक्षक बापू कदम (Bapu Kadam) याने २०२४ साली तिच्याशी संपर्क साधला. “माझी कोथरूडमध्ये (Kothrud) डेअरी असून, शाळेच्या उपाहारगृहासाठी माझ्याकडून दूध-पनीर घ्या,” असे त्याने सुचवले. त्याच्यावर विश्वास ठेवून महिलेने त्याला वेळोवेळी एकूण २२ लाख २ हजार रुपये दिले, मात्र कदमने कोणताही माल पुरवला नाही.
माल न मिळाल्याने महिलेने विचारणा केली असता, जानेवारी २०२५ मध्ये कदमने आपले खरे रूप दाखवले. आपण निलेश घायवळ टोळीसाठी काम करत असल्याचे सांगत, त्याने “आमच्याकडूनच माल घ्यावा लागेल, नाहीतर व्यवसाय बंद करू,” अशी धमकी दिली. त्यानंतर, महिला गाडीतून जात असताना कदमने तिची वाट अडवली. त्याचवेळी दुसऱ्या गाडीतून निलेश घायवळ, सचिन घायवळ व इतर साथीदार आले. सचिनने महिलेला जीवे मारण्याची धमकी देत, “जिवंत राहायचे नसेल तर पैसे देऊ नका,” असे म्हटले. घाबरलेल्या महिलेने पुन्हा २२ लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा केले.
Nilesh Ghaywal | फसवणूक उघडकीस
सततच्या धमक्या आणि पैशांची मागणी यामुळे महिलेने आपल्या भागीदारांशी चर्चा केली आणि चौकशी केली असता, कदमने सांगितलेली कोणतीही डेअरी कोथरूडमध्ये अस्तित्वात नसल्याचे उघड झाले. यानंतर तिने तातडीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी निलेश घायवळ, सचिन घायवळ, बापू कदम, पप्पू दळवी (Pappu Dalvi), अभि गोरडे (Abhi Gorde), दीपक आमले (Deepak Amle), बाबू वीर (Babu Veer), अमोल बंडगर (Amol Bandgar), बाबू पिसाळ (Babu Pisal), अमोल लाखे (Amol Lakhe), संदीप फाटक (Sandeep Phatak), बबलू गोळेकर (Bablu Golekar) आणि बबलू सुरवसे (Bablu Suravase) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या १३ जणांविरुद्ध खंडणी आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम (Sambhaji Kadam) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास वारजे पोलीस करत आहेत. निलेश घायवळ हा कोथरूड गोळीबार प्रकरणात आधीच फरार असून, त्याला व इतर आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या घटनेने घायवळ टोळीची गुन्हेगारी कृत्ये पुन्हा एकदा समोर आली आहेत.






