Pune Ganesh Visarjan | पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीसाठी यंदा काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. पोलिस प्रशासन, मंडळे आणि स्वयंसेवक यांच्यात समन्वय साधून वेळापत्रक व मार्ग निश्चित करण्यात आले असून, यंदाची मिरवणूक नेहमीपेक्षा एक तास आधी, म्हणजे शनिवारी (६ सप्टेंबर) सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणार आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानाचे पाचही गणपती दुपारी १२ वाजेपर्यंत बेलबाग चौक पार करतील, असे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे मिरवणुकीला लागणारा वेळ कमी होईल आणि गर्दीचे व्यवस्थापन सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
वेळापत्रक – मानाचे पाच गणपती :
सकाळी ९.३०: कसबा गणपती मंडळाचे मंडईतील टिळक पुतळा येथे आगमन व पूजा. त्यानंतर मुख्य मिरवणुकीला प्रारंभ.
सकाळी १०.३०: तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ बेलबाग चौकातून मार्गस्थ.
सकाळी ११.००: गुरुजी तालीम गणपती मंडळ पूजा व आरतीनंतर मिरवणुकीस प्रारंभ. (Pune Ganesh Visarjan)
दुपारी १२.००: तुळशीबाग गणपती मंडळ आणि केसरीवाडा गणपती मंडळ बेलबाग चौकातून मार्गस्थ.
दुपारी १.००: महापालिकेचा गणपती व त्वष्टा कासार गणपती मंडळ सहभागी.
यानंतर, दुपारी ४.०० वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ मिरवणुकीत सामील होईल. तर सायंकाळी ५.३० वाजता जिलब्या मारुती, हुतात्मा बाबू गेनू, भाऊसाहेब रंगारी व अखिल मंडई मंडळ सहभागी होतील. मानाची मंडळे सायंकाळी सातपर्यंत बेलबाग चौकातून मार्गस्थ होतील.
Pune Ganesh Visarjan | पोलिसांचे मार्गदर्शक नियम :
– एका मंडळाला जास्तीत जास्त दोनच ढोल पथकांची परवानगी असेल, प्रत्येक पथकात ६० सदस्यांची मर्यादा.
– एकाच वेळी दोन ढोल पथकांना वादनास मनाई.
– स्थिर वादनावर बंदी.
– सर्व मंडळांनी बेलबाग चौकातूनच मिरवणुकीत प्रवेश करावा.
– मानाचा पहिला कसबा गणपती टिळक चौक पार करेपर्यंत इतर मंडळांना प्रवेश नाही.
– विद्युत रोषणाई व देखावे सायंकाळी ७ नंतरच मिरवणुकीत सहभागी होऊ शकतात.
– सुरक्षितता आणि व्यवस्थापन
गर्दीचे व्यवस्थापन, वाहतुकीची सोय आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. स्वयंसेवक, मंडळे आणि नागरिकांनी नियमांचे पालन करून विसर्जन सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






