Pune News | पुणे (Pune) शहरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुणे महानगरपालिकेने (PMC) दोन महत्त्वाच्या बोगदा प्रकल्पांच्या कामाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. तळजाई-पाचगाव (Taljai-Pachgaon) आणि सुतारदरा-पंचवटी (Sutardara-Panchwati) या दोन प्रस्तावित बोगद्यांमुळे शहरातील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होणार आहे.
पुण्यातील वाहतूक व्यवस्थापनावर मोठा ताण :
वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या यामुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्थापनावर मोठा ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पायाभूत सुविधा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार, महानगरपालिका प्रशासनाने या दोन्ही बोगद्यांच्या कामाला प्राधान्य दिले असून, नुकतीच अधिकाऱ्यांनी प्रकल्पासाठी आवश्यक जागेची पाहणी केली आहे.
Pune News | प्रकल्प शहराच्या दीर्घकालीन वाहतूक धोरणाचा एक महत्त्वाचा भाग :
यातील तळजाई-पाचगाव बोगदा हा सातारा रस्ता (Satara Road) आणि सिंहगड रस्त्याला (Sinhagad Road) थेट जोडणार आहे. सध्या या दोन रस्त्यांदरम्यान प्रवास करण्यासाठी सुमारे ९ ते १० सिग्नल ओलांडावे लागतात आणि यासाठी ४० ते ५० मिनिटांचा वेळ लागतो. हा बोगदा पूर्ण झाल्यावर, हेच अंतर अवघ्या २.५ किलोमीटरवर येईल आणि प्रवासाचा वेळ फक्त १० मिनिटांवर येणार आहे.
या बोगद्यांमुळे नागरिकांचा केवळ वेळच वाचणार नाही, तर इंधनाचीही मोठी बचत होईल आणि शहरातील रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. हे प्रकल्प शहराच्या दीर्घकालीन वाहतूक धोरणाचा एक महत्त्वाचा भाग असून, ते वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाचे लक्ष केंद्रित आहे.






