Andekar Vs Komkar | पुण्यातील गुन्हेगारी विश्वात चर्चेत असलेला आंदेकर आणि कोमकर गटांमधील संघर्ष आता थेट राजकारणाच्या मैदानात उतरला आहे. आंदेकर टोळीच्या हल्ल्यात ठार झालेल्या आयुष कोमकरच्या आईने, कल्याणी कोमकर यांनी थेट निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २३ मधून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
गुन्हेगारी संघर्षामुळे आधीच चर्चेत असलेल्या या प्रकरणाला आता निवडणुकीची किनार मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आंदेकर कुटुंबातील सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यानंतर, कोमकर विरुद्ध आंदेकर (Andekar Vs Komkar) हा वाद पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील निवडणूक प्रचार अधिकच तणावपूर्ण होण्याची चिन्हं आहेत.
शिंदेच्या शिवसेनेतून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष लढत :
आयुष कोमकरच्या (Ayush komkar) हत्येनंतर कल्याणी कोमकर यांनी न्यायासाठी लढा उभारला होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, तिथून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या हत्येचा बदला आणि अन्यायाविरोधात लढण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
याआधी कल्याणी कोमकर यांनी अजित पवार यांना थेट इशारा दिला होता. आंदेकर कुटुंबीयांना उमेदवारी दिल्यास आत्मदहन करेन, असा टोकाचा इशारा त्यांनी दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. तरीही राष्ट्रवादीकडून आंदेकर कुटुंबातील दोन महिलांना तिकीट देण्यात आल्यानंतर, त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार अधिक ठाम केला.
Andekar Vs Komkar | आंदेकरांना राजकीय पाठबळाचा आरोप; तणाव वाढण्याची शक्यता :
कल्याणी कोमकर (Kalyani komkar) यांनी आंदेकर कुटुंबावर गंभीर आरोप करत, त्यांना राजकीय लोकांचे संरक्षण मिळत असल्याचं म्हटलं आहे. आंदेकरांच्या विरोधात कोर्टात लढा देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. कोणत्याही पक्षाने आंदेकरांना उमेदवारी दिल्यास पक्ष कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात पुण्यात राजकीय आंदोलनं आणि तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे आंदेकर कुटुंबीयांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. वनराज आंदेकर (Vanraj andekar) माझा भाऊ आहे, आम्ही कोणत्याही सुपारी प्रकरणात सहभागी नाही, असा दावा आंदेकर कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, आता गुन्हेगारी आणि राजकारण यांची सरमिसळ होत असलेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून, पुण्यातील ही लढत केवळ निवडणूक नसून दोन गटांतील संघर्षाचं प्रतीक बनली आहे.






