Pune Crime News | पुण्यातून पुन्हा एकदा महिला अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे संपूर्ण शहर हादरून गेले आहे. उरुळी कांचन परिसरातील सोरतापवाडी येथे राहणाऱ्या इंजिनिअर असलेल्या विवाहित महिलेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे काही महिन्यांपूर्वी गाजलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा तत्काळ हालचालीत आली असून, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chanaknar) यांनी थेट पीडित कुटुंबीयांची भेट घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत विवाहितेचे नाव दीप्ती मगर-चौधरी (Dipti Chaudhari Death) असून ती इंजिनिअर होती. लग्नानंतर सुरुवातीला तिचं आयुष्य सुरळीत सुरू होतं, मात्र काही काळानंतर सासरच्या मंडळींकडून आर्थिक मागण्या सुरू झाल्या. आधी दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली, त्यानंतर कारची मागणी झाली. कुटुंबीयांनी या मागण्या पूर्ण करूनही दीप्तीचा मानसिक छळ सुरूच राहिला. सतत अपमान, टोमणे आणि दबावामुळे ती प्रचंड तणावात होती.
गर्भपात आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप :
दीप्तीच्या (Dipti Chaudhari) कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांनुसार, तिच्या इच्छेविरुद्ध गर्भलिंग तपासणी करण्यात आली. दुसऱ्यांदा मुलगी असल्याचे समजताच तिला गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले. या अमानवी वागणुकीमुळे दीप्ती पूर्णपणे खचून गेली होती. अखेर तिने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपींवर तात्काळ कारवाई होत नसल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला असून, राजकीय हस्तक्षेपामुळे तपासात अडथळे येत असल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे संपूर्ण प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे.
Pune Crime News | रुपाली चाकणकर थेट कुटुंबीयांच्या भेटीला; काय म्हणाल्या? :
या घटनेची गंभीर दखल घेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दीप्तीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांचे म्हणणे ऐकून घेतले आणि कायदेशीर मदतीबाबत आश्वासन दिले. त्या म्हणाल्या, “कोणत्याही महिलेला सासरी त्रास होत असेल तर तिने तातडीने आवाज उठवला पाहिजे. वन स्टॉप सेंटरपासून मोफत वकील, समुपदेशन आणि कायदेशीर संरक्षण यांसारख्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. या सर्व गोष्टी गोपनीय ठेवण्यात येतात, त्यामुळे पीडित महिलांनी घाबरून न जाता मदत घ्यावी.”
पुढे त्या म्हणाल्या की महाराष्ट्रातील कायदे महिलांच्या संरक्षणासाठी अत्यंत सक्षम असून, दोषींवर कठोर कारवाई होणार आहे. “आपण सर्वांनी आपल्या लेकींच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं. हा केवळ एका कुटुंबाचा प्रश्न नसून समाजाचा प्रश्न आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. (Pune Crime News)
तपासाला वेग, समाजात संतापाची लाट :
दीप्तीच्या आत्महत्येनंतर पोलिस तपासाला वेग आला असून, संबंधित आरोपींची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे पुणे आणि परिसरात संतापाची लाट उसळली असून, महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतरही अशाच स्वरूपाची घटना समोर आल्याने, समाजात चिंता आणि असंतोष व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणात कठोर कारवाईचे संकेत दिले असून, पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या घटनेमुळे महिलांवरील छळ, हुंडाबळी आणि कौटुंबिक अत्याचाराविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
News Title: Pune Crime News: Married Woman Dies Due to Harassment, Rupali Chakankar Meets Family






