Vaishnavi Hagawane | पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे (Rajendra hagwane) यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेनंतर वैष्णवीच्या वडिलांनी सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी आपल्या मुलीचा छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याच्या एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, वैष्णवीच्या वडिलांनी राजेंद्र हगवणे यांच्या मुलाला लग्नात ५१ तोळे सोने, ७.५ किलो चांदीची ताटे आणि एक फॉर्च्युनर कार हुंडा म्हणून दिली होती.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल :
वैष्णवी आणि शशांक हगवणे यांच्या सनीज वर्ल्ड येथे झालेल्या लग्नाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही (Ajit Pawar) उपस्थित होते. त्यावेळी अजित पवार यांनी हुंड्यात देण्यात आलेल्या फॉर्च्युनर गाडीविषयी चौकशी केल्याचे वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले. अजित पवार लग्नात अर्धा-पाऊण तास थांबले होते आणि त्यांनी वैष्णवी व शशांक यांना आशीर्वाद दिले होते.
वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नात दिलेल्या फॉर्च्युनर गाडीकडे पाहून अजित पवार यांनी राजेंद्र हगवणे यांना खोचकपणे विचारले होते की, “ही गाडी तुम्ही मागितली आहे की त्यांनी दिली आहे?” त्यावेळी तिथे अनेकजण उपस्थित होते आणि अजित पवारांचा हा प्रश्न ऐकून सगळेच हसले होते, असे वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले. (Vaishanvi hagwane death)
Vaishnavi Hagawane | अजित पवारांनी आपल्या मुलीला न्याय द्यावा :
राजेंद्र हगवणे हे अजित पवार यांच्या पक्षाचे पदाधिकारी असल्याने आणि त्यांचे अजित पवारांशी जवळचे संबंध असल्याने, या प्रकरणाला राजकीय रंगही चढत आहे. राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या सूनेबाबतही असाच प्रकार घडला होता. नोव्हेंबर २०२४ मध्ये तिने पोलिसांत तक्रार दिली होती आणि ती केस अजूनही सुरू आहे. मात्र, ते प्रकरण दाबण्यात आल्याचा आरोप होत आहे. हगवणेंची मोठी सून वैष्णवीच्या अंत्ययात्रेला आली होती आणि तिनेदेखील वैष्णवीवर होणाऱ्या अत्याचाराबाबत तिच्या वडिलांना सांगितले होते.
वैष्णवीच्या वडिलांनी आपल्या अगतिकतेतून सांगितले की, त्यांना अजित पवार यांच्यापर्यंत थेट पोहोचता येत नाही, कारण त्यांची अजितदादांपर्यंत ओळख नाही. मात्र, ते अजित पवारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. हगवणे कुटुंबीयांना अटक करून अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या मुलीला न्याय द्यावा, अशी मागणी वैष्णवीच्या वडिलांनी केली आहे. राजेंद्र हगवणे यांना राजकीय पाठबळ असल्यानेच त्यांच्या मोठ्या सूनेची केसही व्यवस्थित ओपन होत नाही, असा आरोपही वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणाच्या तपासातून सत्य बाहेर येऊन दोषींना कठोर शिक्षा मिळावी, अशी अपेक्षा वैष्णवीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.






