“जो आमच्या नादी लागणार…”; आंदेकर गँगने आयुष कोमकरवर गोळीबार कसा केला? प्रत्यक्षदर्शीचा हादरवणारा खुलासा

On: September 12, 2025 10:01 AM
Ayush Komkar Murder
---Advertisement---

Ayush Komkar Murder | पुण्यातील नाना पेठ परिसरात ५ सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या टोळीयुद्धाने संपूर्ण शहर हादरले. फक्त १९ वर्षांच्या आयुष कोमकरवर आंदेकर गँगने थेट गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे आयुषचा गुन्हेगारी जगताशी काहीही संबंध नव्हता, तरीही वर्षभरापूर्वी झालेल्या वनराज आंदेकर (Vanraj andekar) हत्येच्या बदल्यासाठी त्याला लक्ष्य करण्यात आलं. आता या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार ठरलेला आयुषचा लहान भाऊ अर्णव कोमकरने पहिल्यांदाच थरारक घटनाक्रम सांगितला आहे.

“भाऊ जमिनीवर कोसळला, पोलीस आणि ॲम्बुलन्स उशिरा आले” :

अर्णव कोमकर सांगतो, “त्या रात्री भाऊ मला क्लासमधून घरी आणायला आला होता. मला खाली सोडल्यानंतर तो गाडी पार्किंगमध्ये लावत होता. अचानक दोन जण धावत आले आणि फायरिंग सुरू केलं. जवळपास १२ गोळ्या झाडल्या, त्यापैकी ९ थेट भावाच्या शरीरात घुसल्या. पहिल्या दोन गोळ्यांनंतर तो जमिनीवर कोसळला. मी पूर्ण गोंधळून गेलो. पोलिसांना यायला अर्धा तास लागला, ॲम्बुलन्स ४५ ते ५० मिनिटांनी आली. तोपर्यंत भावाचा देह तसाच रक्ताच्या थारोळ्यात पडून होता.” (Ayush Komkar Murder Case)

अर्णवच्या मते, सोसायटीतील एका डॉक्टरांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत खूप रक्तस्राव झाला होता. “पोलीस केस आहे, त्यांना कळवा” असं डॉक्टरांनी सांगितलं. पण वेळेवर उपचार मिळाले नाहीत आणि आयुष्याचं आयुष्य संपलं.

Ayush Komkar Murder | आंदेकर गँगचे शेवटचे शब्द – “जो आमच्या नादी लागणार त्याचं असंच होणार” :

गोळीबारानंतर पळताना मारेकऱ्यांनी मोठमोठ्याने घोषणा दिल्या. “इथे फक्त कृष्णा आंदेकर आणि बंडू अण्णा आंदेकर चालणार, बाकी कोण नाही. जो आमच्या नादी लागणार त्याचं असंच होणार” असं ते म्हणाले होते, असं अर्णवने स्पष्ट केलं.

त्याच वेळी परिसरात “टपका रे टपका, एक और टपका” हे गाणं वाजवलं गेलं. या दृश्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

पाच वर्षांपूर्वीची वैरागं आणि सूड :

अर्णवच्या मते, “आमची आंदेकर कुटुंबाशी पाच वर्षांपूर्वी भांडण झालं होतं. त्यानंतर आम्ही त्यांच्याशी संबंध ठेवले नाहीत. मात्र वनराज आंदेकरच्या (Vanraj andekar) हत्येनंतर त्यांनी आमच्यावर डोळा ठेवला. मामाच्या हत्येचा बदला घेणार अशी त्यांनी शपथ घेतली होती.”

हीच शपथ पूर्ण करण्यासाठी आयुषला लक्ष्य करण्यात आल्याचं तपासात समोर आलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हत्येच्या आधी आरोपींनी रेकी केली होती. पण पोलिसांना माहिती मिळाल्याने पहिला प्लॅन फसला. अखेर ५ सप्टेंबरला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गँगने हल्ला घडवून आणला.

पोलिस तपास आणि पुढील कारवाई :

१ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj andekar) यांची हत्या झाली होती. त्यात गणेश कोमकरसह २१ आरोपींना अटक करण्यात आली. मात्र आयुषचा या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता. तरीही आंदेकर गँगने सूड उगवण्यासाठी त्याची हत्या केली.

सध्या पोलिसांनी अनेक आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. पण या घटनेने पुण्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आयुषच्या हत्येनंतर आंदेकर गँगचा दबदबा आणि पोलिसांच्या विलंबित प्रतिसादावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

News Title: Pune Crime: Eyewitness Arnab Komkar Reveals How Andekar Gang Killed Ayush Komkar

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now