Ayush Komkar Killing | पुण्यात काल रात्री रक्तरंजित थरार घडला. नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar Murder) यांच्या खुनाच्या वर्षश्राद्धाच्या पार्श्वभूमीवर आंदेकर टोळीने बदला घेतल्याचे चित्र उभे राहिले आहे. या संघर्षात गणेश कोमकरचा मुलगा आयुष ऊर्फ गोविंद गणेश कोमकर (वय 18) याचा खून करण्यात आला. गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
नाना पेठेत पार्किंगमध्ये गोळ्या :
शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास आयुष क्लासवरून घरी परतला होता. नाना पेठेतील श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्समधील पार्किंगमध्ये उभा असताना दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हा हल्ला आंदेकर टोळीने केला असल्याची माहिती समोर आली आहे.
1 सप्टेंबर 2024 रोजी नाना पेठेत वनराज आंदेकर यांची निर्घृण हत्या झाली होती. कोयत्याचे वार आणि गोळीबार करून त्यांना ठार करण्यात आले होते. वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्या अंत्यविधीला आंदेकर टोळीच्या सदस्यांनी शस्त्रपूजन करून बदला घेण्याची शपथ घेतल्याची माहिती पोलिसांकडे होती. त्याचाच परिणाम म्हणून एक वर्ष उलटताच आयुष कोमकरचा बळी गेला असे दिसते.
Ayush Komkar Killing | टोळीयुद्धाचा पार्श्वभूमी :
गणेश कोमकरची पत्नी ही कुख्यात गुंड बंडू आंदेकरची मुलगी आहे. त्यामुळे आंदेकर-कोमकर यांचे कौटुंबिक नाते असले तरी वनराज आंदेकर खुनानंतर या संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली. आंदेकर-गायकवाड संघर्षाच्या धगधगीत वातावरणात कोमकर कुटुंबालाही लक्ष्य करण्यात आले आणि या संघर्षात बंडू आंदेकरच्या नातवाचाच बळी गेला.
या प्रकरणी याआधी भारती विद्यापीठ पोलिसांनी बदल्याचा एक कट उधळून लावला होता. चार जणांना अटक करून दोन पिस्तुले जप्त करण्यात आली होती. मात्र, उरलेल्या आरोपींनी तीन शस्त्रांसह कट पुढे राबवला आणि नाना पेठेत आयुषवर हल्ला केला. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या विशेष पथकांनी मोहीम सुरू केली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत घडलेल्या या खुनामुळे पुण्यातील वातावरण तणावग्रस्त झाले आहे.






