Sachin Tendulkar | माझी बहीण लग्नानंतर पुण्यात राहायला आली, त्यामुळे मीदेखील थोडासा पुणेकर आहे. मुंबईसाठी ज्युनियर लेव्हलला क्रिकेटची सुरुवात १९८५ मध्ये पुण्यातच झाली. त्यामुळे पुणे कायमच माझ्यासाठी विशेष आहे, असं माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी म्हटलं आहे.
चितळे बंधू मिठाईवाले (Chitale Bandhu Mithaiwale) यांच्या व्यवसायाला ७५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने ‘कृतज्ञता सोहळ्यात’ सचिन तेंडुलकर यांचा सत्कार (Felicitation) करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
सचिन तेंडुलकर काय म्हणाले?
आयुष्यात कुटुंब या घटकाला खूप महत्त्व आहे. आपल्या चांगल्या क्षणी, अडचणीच्या प्रसंगी कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्याबरोबर तुमचे कुटुंबच असते. क्रिकेट खेळत असताना घर, ड्रेसिंग रूम आणि करोडो भारतीय हेच माझे कुटुंबीय होते, असं सचिन तेंडुलकर म्हणाले.
“अपयश पचवा, पण यशासाठी शॉर्टकट घेऊ नका”
“अपयश पचवा पण यशासाठी शॉर्टकट घेऊ नका. असे धडे मला घरातूनच मिळाले होते. आजकाल अपेक्षांचे ओझे खूप असते. त्यामुळे दबाव येतो, असे आपण ऐकतो. २०११ मध्ये संघातील प्रत्येक जण सकारात्मकतेसोबत दबावात होता, त्यामुळे विश्वचषक जिंकू शकलो. त्यामुळे आयुष्यात दबाव असणे आवश्यक आहे.”, असंही सचिन तेंडुलकर यांनी सांगितलं.
“…आणि माझ्या क्रिकेटचा श्रीगणेशा झाला”
“शाळेत असताना मी खूपच मस्तीखोर (Naughty) होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत झाडावरील कैऱ्या पाडणे, कुणाच्या गाडीची हवा सोडणे असे उद्योग मी करायचो.
त्यामुळे मोठा भाऊ अजित मला रमाकांत आचरेकर (Ramakant Achrekar) सरांकडे घेऊन गेला आणि माझे क्रिकेट सुरू झाले. अजित मला आचरेकर सरांकडे घेऊन गेला नसता, तर मी क्रिकेटपटू म्हणून घडलोच नसतो,” अशी आठवणही तेंडुलकर यांनी सांगितली.
Title: Pune City Always Special to Me says Sachin Tendulkar






