PSI Gopal Badne | सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटण (Phaltan) येथील डॉक्टर संपदा मुंडे (Dr Sampada Munde) आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. फरार असलेला मुख्य आरोपी, निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने (PSI Gopal Badne) हा अखेर पोलिसांना शरण आला असून, चौकशीदरम्यान तो ढसाढसा रडल्याची माहिती आहे. त्याने आपल्यावरील अत्याचाराचे आरोप फेटाळून लावले आहेत.
मध्यरात्री शरणागती आणि कसून चौकशी-
डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पीएसआय गोपाळ बदने याने ४ वेळा बलात्कार केल्याचा आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर (Prashant Bankar) याने शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. या घटनेनंतर बदने फरार झाला होता. शनिवारी रात्री साडेबारानंतर तो स्वतःहून फलटण शहर पोलीस ठाण्यात (Phaltan City Police Station) हजर झाला आणि त्याने शरणागती पत्करली.
पोलिसांनी त्याला (PSI Gopal Badne) तात्काळ ताब्यात घेऊन त्याची सुमारे एक तास कसून चौकशी केली. त्यानंतर रात्री उशिरा त्याला वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आणि पहाटे चारच्या सुमारास पुन्हा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीदरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना बदने अनेकदा रडला. ‘मी त्या मुलीवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार केलेला नाही,’ असे तो वारंवार सांगत होता.
संबंधांवर मौन, पोलिसांसमोर मोठे आव्हान-
चौकशीत बदनेने अत्याचाराचे आरोप नाकारले असले तरी, डॉ. संपदा मुंडे यांच्यासोबत त्याचे नेमके काय संबंध होते आणि त्यांच्यात संमतीने लैंगिक संबंध होते का, या प्रश्नावर मात्र त्याने मौन बाळगल्याचे समजते. बदने (PSI Gopal Badne) स्वतः पोलीस अधिकारी असल्याने त्याला तपास आणि चौकशी प्रक्रियेची पूर्ण कल्पना आहे, त्यामुळे तो अत्यंत सावधपणे उत्तरे देत आहे.
त्याच्याकडून सत्य वदवून घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. तो फरार असताना कुठे लपला होता, त्याला कोणी मदत केली, या काळात तो कोणाकोणाला भेटला, याचाही तपास पोलीस करत आहेत. आज, रविवारी, त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून, पोलीस कोठडी मिळण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याचे नाव आल्याने पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली असून, पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरा आरोपी प्रशांत बनकर याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.






