Priyansh Arya l इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्जच्या प्रियांश आर्य या युवा सलामीवीराने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध असं काही प्रदर्शन केलं की, मैदानावर उपस्थित प्रेक्षकांसह महेंद्रसिंग धोनीही क्षणभर स्तब्ध झाला. प्रियांशने अवघ्या 42 चेंडूत 103 धावांची खेळी करत CSKच्या गोलंदाजांना अक्षरशः झोडपून काढले.
विशेष म्हणजे, प्रियांशने CSKचा ‘ज्युनियर मलिंगा’ म्हणून ओळखला जाणारा मथिशा पथिराना याच्या एकाच षटकात तीन सलग षटकार ठोकले. 13व्या षटकाच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर त्याने षटकार मारले, आणि पाचव्या चेंडूवर चौकार खेचून आपले पहिलं IPL शतक पूर्ण केलं.
धोनीही गप्प! प्रियांशच्या तुफानी खेळीला तोडच नव्हती :
महेंद्रसिंग धोनी यष्टीमागे असतानाही पंजाबच्या प्रियांश आर्यसमोर CSKच्या सर्व रणनीती निष्फळ ठरल्या. धोनी सतत खेळाडूंना मार्गदर्शन करत होता, पण प्रियांशचा हल्लाबोल थांबवणं अशक्य झालं. अखेर नूर अहमदच्या फिरकीपुढे प्रियांश बाद झाला.
त्याआधी मात्र त्याने 9 षटकार आणि 7 चौकारांसह मैदानात धुमाकूळ घातला. त्याची खेळी सामन्याचा निर्णायक टप्पा ठरली. आयपीएलच्या इतिहासात हा डाव सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या तुफानी खेळांपैकी एक ठरला आहे.
Priyansh Arya l पंजाबचा दणदणीत विजय; CSKला मधल्या फळीत फटका :
प्रियांश आर्यच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 219 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल CSKची सुरुवात दमदार होती, पण मधल्या फळीतल्या अपयशामुळे ते गडबडले.
CSKने 20 षटकांत 5 गडी गमावून फक्त 201 धावा केल्या आणि सामना 18 धावांनी पंजाबने जिंकला. या विजयामुळे पंजाब किंग्जच्या गुणतालिकेतील स्थितीत महत्त्वपूर्ण वाढ झाली आहे.






