Pratap Sarnaik | मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) पुढे सरसावले आहेत. मुंबईत झालेल्या आरक्षण आंदोलनात पाच आंदोलकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या सर्व कुटुंबीयांना सरनाईक यांनी स्वतःच्या खर्चातून एकूण २५ लाखांची आर्थिक मदत केली असून, प्रत्येक कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश देण्यात आला. (Maratha Reservation)
धाराशिवमध्ये मदत वाटप :
धाराशिव येथे झालेल्या मदतवाटप कार्यक्रमात सरनाईक यांनी स्वतः हजर राहून धनादेशांचे वाटप केले. या वेळी मृत आंदोलकांच्या कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली.
सरनाईक म्हणाले की, “आरक्षणाच्या लढ्यात बलिदान देणाऱ्या मराठा बांधवांच्या कुटुंबीयांना न्याय आणि आधार मिळावा, हीच आमची भूमिका आहे.”
Pratap Sarnaik | मदत मिळालेल्या कुटुंबीयांची माहिती :
या आंदोलनात ज्यांचा मृत्यू झाला आणि ज्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळाली ते असे :
सतीश देशमुख – गाव वरपगाव, ता. केज, जि. बीड
विजय चंद्रकांत घोगरे – गाव टाकळगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर
अतुल खवचट – गाव केसापुरी, ता. बीड, जि. बीड
गोपीनाथ जाधव – गाव बोराळा, ता. वसमत, जि. हिंगोली
भारत यादव खरसाडे – गाव आहेर वडगाव, ता. बीड, जि. बीड
मराठा आरक्षण लढ्याची पार्श्वभूमी :
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या आंदोलनाला लाखोंच्या संख्येने मराठा समाजाने उपस्थिती लावली होती. सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआर काढत आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला. मात्र, या संघर्षात पाच आंदोलकांचा बळी गेला, ज्यामुळे संपूर्ण राज्यभर शोककळा पसरली होती.






