Bigg Boss 19 | बिग बॉस 19 च्या घरात पुन्हा एकदा खळबळजनक वळण आलं आहे. चाहत्यांचा लाडका कॉमेडियन प्रणीत मोरे पुन्हा एकदा घरात धमाकेदार एन्ट्री घेणार आहे. काही दिवसांपूर्वी डेंग्यू झाल्याने त्याला वैद्यकीय कारणास्तव घराबाहेर जावं लागलं होतं. त्याच्या जाण्यानं केवळ स्पर्धकच नव्हे तर चाहत्यांचाही हिरमोड झाला होता. मात्र आता अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. जिओ हॉटस्टारवर (Jio Hotstar) बिग बॉस 19 चा नवा प्रोमो शेअर करण्यात आला असून, त्यात प्रणीत मोरेची एन्ट्री स्टोअर रूममधून दाखवण्यात आली आहे.
फरहानाला धक्का, मृदुलचा आनंदाश्रू :
प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे, स्टोअर रूमची बेल वाजल्यावर निलम गिरीला शंका येते की, कुणीतरी तिथे लपलंय. अभिषेक बजाज आणि गौरव खन्ना देखील उत्साहित होतात. फरहाना भट्ट जेव्हा आत जाते, तेव्हा तिला प्रणीत मोरे दिसतो आणि ती धक्क्यात येते. लगेचच मृदुल धावत आत येतो आणि प्रणीतला मिठी मारतो. या दृश्यात घरातल्या सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसतो.
प्रणीतच्या पुनरागमनानं ‘बिग बॉस 19’च्या घरात पुन्हा उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर #PranitIsBack हा हॅशटॅग ट्रेंड करत त्याचं स्वागत केलं आहे.
Bigg Boss 19 | प्रणीत मोरेला मिळाली खास पॉवर :
फक्त पुनरागमनच नाही, तर प्रणीत मोरे आता एका विशेष अधिकारासह घरात प्रवेश करणार आहे. रिपोर्टनुसार, बिग बॉसनं त्याला “स्पेशल पॉवर” दिली आहे ज्यामुळे तो एका नॉमिनेटेड स्पर्धकाला घराबाहेर जाण्यापासून वाचवू शकतो. या आठवड्यात गौरव खन्ना, निलम गिरी, फरहाना भट्ट, अशनूर कौर आणि अभिषेक बजाज हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत.
चाहत्यांचा अंदाज आहे की प्रणीत मोरे गौरव खन्ना किंवा अशनूर कौर या दोघांपैकी एकाला वाचवू शकतो. त्याशिवाय तो ‘द प्रणीत मोरे शो’ या सेगमेंटचं होस्टिंग करणार असून, घरातील सदस्यांना पुन्हा एकदा त्याच्या खास विनोदी शैलीत रोस्ट करणार आहे.
डेंग्यूमुळे बाहेर गेल्यानंतर प्रणीतच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्या पुनरागमनाची मागणी केली होती. “प्रणीतला परत आणा” अशा ट्रेंड्सने भरलेला ट्विटर टाइमलाइन पाहून आता बिग बॉसनं त्याला पुनः प्रवेश दिल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.






