Prakash Mahajan Resign | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (मनसे) प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan Resign) यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. अनेक वर्षे मनसेसाठी काम करणाऱ्या महाजन यांनी पदत्यागानंतर पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली. “मी जर मनसेत अपराधी असेन तर फक्त अमित ठाकरेंच्या (Amit Thackeray) बाबतीत आहे,” असे ते म्हणाले. पक्ष सोडताना त्यांनी मनातील खंत आणि अपेक्षा उघडपणे व्यक्त केल्या.
महाजन यांनी सांगितले की, “मी एक सामान्य प्रवक्ता म्हणून माझ्यावर सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. मात्र गेल्या काही दिवसांत जाणवू लागलं की आता थांबण्याची वेळ आली आहे. आता आपली गरज तिथे फारशी राहिलेली नाही. काही घटना घडल्या ज्यामुळे मला उमगलं की पुढे राहून फारसा उपयोग नाही. म्हणून मी हा निर्णय घेतला.”
उपेक्षा, अपेक्षा आणि खंत :
प्रकाश महाजन यांनी आपल्या अपेक्षांबद्दल बोलताना स्पष्ट केलं, “मला वाटत होतं की पक्षाच्या प्रचारात जबाबदारी मिळेल, संघटनेत सहभाग मिळेल. मात्र ते घडलं नाही. क्षमता असूनही काम दिलं नाही, योग्यता असूनही सन्मान दिला नाही. एवढ्या कमी अपेक्षा होत्या – थोडा सन्मान आणि थोडं काम – पण त्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे ताणतणाव नको म्हणून मी बाजूला होण्याचा निर्णय घेतला.”
ते पुढे म्हणाले, “11 जुलैनंतर मला जाणवलं की पक्षाला माझी फारशी गरज उरलेली नाही. दोन महिने वाट पाहिली, काहीतरी सकारात्मक होईल असं वाटलं, पण साधी दखलही घेण्यात आली नाही. दरवाजापर्यंत आणून सोडले, अशा परिस्थितीत बाहेर पडणंच योग्य ठरलं.”
Prakash Mahajan Resign | “दोन भाऊ एकत्र आले, आमच्या सद्भावना विसरल्या” :
मनसेतील अंतर्गत परिस्थितीवर बोलताना महाजन यांनी म्हटलं, “दोन भावांनी (राज ठाकरे व उद्धव ठाकरे) एकत्र यावं ही भूमिका मी जाहीरपणे मांडली होती. त्या बोलांचे कडवे टीकेचे बोल मला ऐकावे लागले. पण आज दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. आमच्यासारख्यांच्या सद्भावना त्यामागे होत्या, हे मात्र कोणी लक्षात घेतलं नाही.”
नारायण राणेंविरोधात लढताना पक्षाने आपल्याला एकटं सोडलं, याचीही खंत त्यांनी व्यक्त केली. “प्रकाश महाजन एकटा लढला, हे जगाने पाहिलं. प्रत्येकवेळी संघर्ष करायचा नसतो. कधी कधी शांततेत जगणं, थोडं वाचन करणं हेसुद्धा महत्त्वाचं असतं,” असे ते म्हणाले.
राज ठाकरेंबाबत आदर, अमित ठाकरेंबद्दल खंत :
राज ठाकरेंबद्दल विचारले असता प्रकाश महाजन (Prakash Mahajan Resign) म्हणाले, “रस्सी जल गई मगर बल नही गया. म्हणजेच राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मनातून पूर्णपणे काढून टाकता येणार नाही. ते माझ्यासाठी आदरणीय आहेत. मात्र जर मी मनसेत अपराधी असेन तर फक्त अमित ठाकरेंच्या बाबतीत आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पष्ट सांगितलं होतं की, अमितजींसोबत काम करेन. पण नशीब काही वेगळंच ठरवतं.”
आपल्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या आपण पार पाडल्या, पण त्याचं कौतुक झालं नाही, ही खंत महाजन यांनी व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की, “माझं वय क्षमा करण्याचं आहे. आता संघर्षाऐवजी शांतता पसंत करणार आहे.”






