Rohit Arya Encounter | मुंबईतील पवई परिसरात घडलेल्या आरए स्टुडिओ प्रकरणाने राज्यभरात प्रचंड खळबळ उडाली आहे. रोहित आर्या (Rohit Arya) नावाच्या व्यक्तीने तब्बल 17 लहान मुलांना ओलीस धरून ठेवले होते. एवढंच नव्हे, तर त्याने व्हिडिओद्वारे मुलांना आणि त्यांच्या पालकांना धमकी देत सोशल मीडियावर प्रसारित केले. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मोठे ऑपरेशन राबवले आणि सर्व मुलांची सुखरूप सुटका केली.
पोलिसांनी मागच्या दाराने बाथरूमच्या खिडकीतून शिरून मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. तातडीच्या कारवाईत सर्व मुले सुरक्षित बाहेर काढण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रोहित आर्याच्या हाताला गोळी लागली आणि रक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. सर्व मुलांना तत्काळ रुग्णालयात नेऊन तपासणी करण्यात आली असून ते सर्व सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
कोणती मुले आणि कुठून आली होती? :
या घटनेनंतर समोर आलेल्या माहितीनुसार, ओलीस धरलेली मुले राज्यातील विविध ठिकाणांहून आली होती. या मुलांमध्ये नांदेडमधील पाच, पुणे आणि ठाण्यातील काही मुले, तसेच पनवेल आणि मुंबईतील काही मुले होती. त्यांचे वय अंदाजे 10 ते 15 वर्षे दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार मुराजी पटेल यांनी सांगितले की सर्व मुलांची मेडिकल तपासणी पूर्ण झाली असून ते आपल्या पालकांसोबत घरी परतले आहेत. (Rohit Arya Encounter)
या घटनेनंतर मुलांची मानसिक स्थिती तपासण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांचाही सल्ला घेण्यात आला आहे. पोलिसांनी मुलांची प्राथमिक स्टेटमेंट नोंदवली असून त्यांचे मोबाईल क्रमांक आणि इतर माहिती घेतली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Rohit Arya Encounter | पाच दिवसांपासून सुरू होती शूटिंग, आर्याने आखला होता कट :
मिळालेल्या माहितीनुसार, पाच दिवसांपासून आरए स्टुडिओमध्ये शूटिंग सुरू होते. रोहित आर्या उर्फ रोहित हारोलीकर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीने ही संपूर्ण योजना आखली होती. त्याचे मूळ घर पुण्यातील कोथरूडमधील स्वरांजली सोसायटीत असून त्याचे आई-वडील तिथे राहत असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, आर्याने आधीच काही ज्वलनशील पदार्थ स्टुडिओत आणून ठेवले होते. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी तपास सुरू ठेवला असून अजून काही पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक विभागाचे वरिष्ठ अधिकारी स्वतः घटनास्थळी उपस्थित आहेत.






