Powai | मुंबईतील (Mumbai) पवई (Powai) परिसरात वेबसीरीज ऑडिशनच्या (Web Series Audition) नावाखाली १७ मुलांना ओलीस ठेवण्याच्या घटनेचा नाट्यमय शेवट झाला आहे. आरोपी रोहित आर्य (Rohit Arya) याने पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर, पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल गोळीबारात तो जखमी झाला. यानंतर पोलिसांनी सर्व मुलांची सुखरूप सुटका केली.
आरोपीची धमकी आणि पोलिसांसोबत चकमक-
रोहित आर्य याने (Powai) वेबसीरीजच्या ऑडिशनसाठी आलेल्या १७ मुलांना एका स्टुडिओत डांबून ठेवले होते. त्याने पोलिसांना व्हिडिओद्वारे धमकी देत, “जर माझ्या मागण्या मान्य केल्या नाहीत किंवा कोणी आत येण्याचा प्रयत्न केला, तर मी संपूर्ण जागेला आग लावेन आणि स्वतःला संपवेन,” असा इशारा दिला होता.
पोलिसांनी त्याला समजावण्याचा बराच वेळ प्रयत्न केला, मात्र तो दरवाजा उघडण्यास किंवा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर, त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, पवई पोलिसांनी (Powai Police) स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.
छातीत गोळी लागल्याने आरोपी जखमी, मुलांची सुटका-
पोलिसांनी झाडलेली गोळी आरोपी रोहित आर्यच्या छातीच्या डाव्या बाजूस लागल्याने तो जखमी झाला. आरोपी जखमी होताच, पोलिसांनी तात्काळ स्टुडिओच्या बाथरूमच्या खिडकीतून आत प्रवेश केला आणि सर्व १७ मुलांची सुखरूप सुटका केली.
या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून, सर्व मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. जखमी आरोपी रोहित आर्यला पोलिसांच्या ताब्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागे त्याचा नेमका हेतू काय होता, याचा सखोल तपास मुंबई पोलीस (Mumbai Police) करत आहेत. घटनास्थळावरून एक एअर गन आणि काही रसायनेही जप्त करण्यात आली आहेत.






