Fish Venkat Death | तेलुगू चित्रपटसृष्टीत आपल्या विनोदी भूमिकांमुळे प्रचंड लोकप्रिय झालेले अभिनेते फिश वेंकट यांचं आज दुःखद निधन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून मूत्रपिंड आणि यकृताच्या आजाराशी झुंज देणाऱ्या वेंकट यांनी हैदराबादमधील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण तेलुगू इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
अनेक महिने डायलिसिसवर, शेवटी हार :
वेंकट यांच्या प्रकृतीत गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं बिघाड होत होता. ते नियमित डायलिसिसवर होते. त्यांची कन्या श्रावंतीने काही काळापूर्वी त्यांच्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी ५० लाखांची मदत मागितली होती.
पवन कल्याण, विश्वक सेन यांसारख्या कलाकारांनी आणि राज्यातील मंत्र्यांनीही त्यांना आर्थिक मदत केली होती. मात्र योग्य किडनी डोनर मिळू शकला नाही. अलीकडे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं आणि ICU मध्ये उपचार सुरू असतानाच आज त्यांचा मृत्यू झाला.
Fish Venkat Death | वैयक्तिक आयुष्य आणि कुटुंब :
वेंकट यांचं खरं नाव ‘वेंकट राज’ होतं, मात्र त्यांनी “फिश वेंकट” या नावाने आपली ओळख निर्माण केली. ‘बानी’, ‘अधर्स’, ‘धी’, ‘गब्बर सिंग’, ‘डीजे टिल्लू’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांच्या विनोदी आणि खलनायकी पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. विशेषतः त्यांच्या तेलंगणा लहेजातील विनोदी संवादांनी त्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली होती.
फिश वेंकट हे पत्नी सुवर्णा आणि मुलगी श्रावंती यांच्यासोबत हैदराबादमध्ये राहत होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबासह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी त्यांच्या जाण्यावर दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.






