Pooja Khedkar | बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे कुटुंब पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. नवी मुंबईतील अपघात आणि अपहरण प्रकरणानंतर आता पुण्यातील त्यांच्या बंगल्यात घडलेल्या घटनांनी खळबळ उडवली आहे. दिलीप खेडकर (Dilip Khedkar) आणि मनोरमा खेडकर यांच्यावर अपहरण, पोलिसांशी अरेरावी आणि आरोपीला पळवून लावल्याचे गंभीर आरोप आहेत.
जेवणाचे डबे आणि संशय वाढला :
सोमवारी खेडकरांच्या पुण्यातील बंगल्यात दोन जेवणाचे डबे पोहोचले. गेट बंद असल्याने हे डबे सुरक्षा भिंतीवर ठेवण्यात आले. काही वेळातच एक कर्मचारी ते उचलून निघून गेला. या घटनेनंतर प्रश्न निर्माण झाले की, हे डबे नक्की कोणासाठी मागवले होते? दिलीप आणि मनोरमा खेडकर अजूनही बंगल्यात लपले आहेत का? ही माहिती मिळताच पुणे पोलिस तातडीने बंगल्यावर दाखल झाले. (Pooja Khedkar Case)
दरवाजा उघडण्यास कोणीही तयार न झाल्याने पोलिसांनी गेट चढून आत प्रवेश केला. त्यांनी घरातील उपस्थित व्यक्तींचे जबाब नोंदवले. मात्र फरार असलेले दिलीप आणि मनोरमा खेडकर सापडले नाहीत. पोलिसांचा शोधमोहीम अजूनही सुरू आहे.
Pooja Khedkar | अपघात आणि अपहरण प्रकरणाचा धागा :
शनिवारी रात्री मुलुंड–ऐरोली मार्गावर ट्रक आणि MH 12 RP 5000 क्रमांकाच्या लँड क्रूझरचा अपघात झाला. अपघातानंतर कारमधील दोन व्यक्तींनी ट्रकचा हेल्पर प्रल्हाद कुमार याला जबरदस्तीने गाडीत बसवून नेले. पोलिस तपासादरम्यान तीच कार पुण्यातील खेडकरांच्या बंगल्यासमोर उभी असल्याचे आढळले.
पोलीस चौकशीसाठी आले असता, मनोरमा खेडकर यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला आणि पोलिसांवर घरातील कुत्रे सोडल्याचा आरोप झाला. काही वेळाने प्रल्हाद कुमार याला पोलिसांकडे सोपवण्यात आले, पण याच दरम्यान दिलीप खेडकर दुसऱ्या मार्गाने पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.
गुन्हा दाखल आणि फरारी :
या प्रकारानंतर मनोरमा खेडकर यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे आणि आरोपीला पळवून लावणे अशा गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला गेला आहे. (Pooja Khedkar News)
तसेच, खेडकर कुटुंबाने नवी मुंबई पोलिसांनी घराबाहेर लावलेली नोटीस फाडल्याचेही उघड झाले. सध्या दिलीप आणि मनोरमा खेडकर अपहरणासाठी वापरलेल्या गाडीसह फरार आहेत आणि त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.






