नीलेश घायवळ टोळीवर पोलिसांची पुन्हा एकदा कारवाई! एका आरोपीला घेतलं ताब्यात

On: October 16, 2025 6:19 PM
Nilesh Ghaywal
---Advertisement---

Nilesh Ghaiwal | पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ टोळीवर पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाई करत सराइत गुन्हेगार आणि गांजा तस्कराला अटक केली आहे. खंडणीविरोधी पथकाने नऱ्हे परिसरातून दोन आरोपींना पकडले असून त्यांच्याकडून सुमारे ९०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे घायवळ टोळीच्या गुन्हेगारी हालचालींना पुन्हा एकदा आळा बसला आहे. (Nilesh Ghaiwal Gang)

खंडणीविरोधी पथकाची कारवाई :

कोथरूड परिसरात १७ सप्टेंबर रोजी दुचाकीला जागा न दिल्याने घायवळ टोळीतील (Ghaiwal Gang) सराइतांनी एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केला होता. त्यानंतर या टोळीने त्याच भागात एका तरुणावर कोयत्याने वार करून परिसरात दहशत निर्माण केली होती. या प्रकरणी पोलिसांनी मयूर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राऊत, मयंक उर्फ मॉन्टी व्यास, आनंद चांदलेकर उर्फ अंड्या, आणि दिनेश फाटक यांना अटक केली होती.

मात्र, काही आरोपी अद्याप फरार होते. याच प्रकरणातील पसार आरोपी मुसाब शेख (वय ३४, रा. नन्हे) हा नऱ्हे परिसरात लपून बसल्याची माहिती खंडणीविरोधी पथकातील पोलीस कर्मचारी अमोल घावटे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून मुसाब शेखला अटक केली. तपासादरम्यान त्याचा साथीदार तेजस डांगी (वय ३३) हा गांजा तस्करीत गुंतलेला असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तत्काळ त्यालाही ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून ९०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.

ही संपूर्ण कारवाई गुन्हे शाखेचे अतिरक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे आणि सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, उपनिरीक्षक गौरव देव, सुरेंद्र जगदाळे, पवन भोसले, प्रशांत शिंदे, अमोल राऊत, दिलीप गोरे, अनिल कुसाळकर आणि गणेश खरात यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.

Nilesh Ghaiwal | घायवळ टोळीवर वाढत चाललेले पोलिसांचे जाळे :

कोथरूड (Kothrud) गोळीबार प्रकरणानंतर नीलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध ‘मकोका’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर टोळीतील काही सदस्य फरार झाले होते. पोलिसांच्या सततच्या शोधमोहीमेमुळे आता या टोळीतील अनेक जणांना एकामागोमाग एक पकडण्यात येत आहे. आतापर्यंत नीलेश घायवळ (Nilesh Ghaiwal) याच्याविरुद्ध सहा गुन्हे दाखल झाले असून त्याचा भाऊ सचिन याच्याविरुद्धही ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

घायवळ टोळी पुणे शहरात दहशत माजविण्यासाठी प्रसिद्ध आहे. खंडणी, मारामाऱ्या, शस्त्रसाठा आणि मादक पदार्थांच्या तस्करीसारख्या गुन्ह्यांमध्ये या टोळीचे नाव वारंवार समोर आले आहे. या टोळीच्या कारवायांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पोलिसांच्या तातडीच्या आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे या टोळीच्या हालचालींवर आळा बसण्यास मदत झाली आहे.

शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने या गुन्हेगारी टोळीवर अधिक कडक नजर ठेवण्याचे संकेत दिले आहेत. “गुन्हेगार कितीही सराईत असले तरी कायद्याच्या चौकटीतून सुटू शकत नाहीत,” असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. या कारवाईनंतर घायवळ टोळीतील उरलेल्या फरार सदस्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे.

News Title: Police crackdown on gang of drug traffickers! Ganja smugglers arrested

Join WhatsApp Group

Join Now