PM Modi Diwali Gift | स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदाच्या दिवाळीत देशवासियांना मोठं गिफ्ट देण्याची घोषणा केली. लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून बोलताना त्यांनी देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला, पाकिस्तानच्या दहशतवादावर कठोर शब्दांत टीका केली आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पुढे जाण्यासाठी स्वदेशीचे महत्त्व अधोरेखित केले.
मोदी म्हणाले की, “एखादी व्यक्ती जितकी इतरांवर अवलंबून राहते तितकेच त्याच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. अवलंबित्व ही हतबलतेची नव्हे, तर मजबुतीची जाणीव असावी. स्वदेशी ही आपली ताकद आहे आणि व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांवर स्वदेशी वस्तू विक्रीचे फलक लावावेत.” त्यांनी स्पष्ट केलं की, स्वावलंबन हा केवळ पर्याय नसून देशाच्या आर्थिक सामर्थ्याचा पाया आहे. (PM Modi Diwali Gift)
जीएसटी सुधारणा आणि दिवाळीचे गिफ्ट :
पंतप्रधान मोदींनी भाषणात जीएसटी संदर्भात महत्त्वाचे संकेत दिले. त्यांनी सांगितले की, “जीएसटी लागू होऊन आठ वर्षे झाली आहेत. या कालावधीत आम्ही कररचनेत मोठ्या सुधारणा केल्या आणि कर प्रक्रिया सुलभ केली. आता काळाची मागणी आहे की, याचा आढावा घ्यावा.”
राज्य सरकारांशी चर्चा करून पुढील पिढीतील जीएसटी सुधारणा आणण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. दिवाळीपर्यंत कररचनेत बदल जाहीर होण्याची शक्यता असून, त्यामुळे लघु उद्योग, एमएसएमई क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. यामुळे दैनंदिन वापरातील अनेक उत्पादने स्वस्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
PM Modi Diwali Gift | लघु उद्योगांना दिलासा आणि नागरिकांचा फायदा
मोदी म्हणाले की, “नागरिकांना द्यावा लागणारा कर कमी करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे उत्पादन खर्च घटेल, ग्राहकांना स्वस्त दरात वस्तू मिळतील आणि उद्योगक्षेत्रातील स्पर्धात्मकता वाढेल.” त्यांनी स्पष्ट केले की, या सुधारणा केवळ मोठ्या उद्योगांसाठी नव्हे, तर ग्रामीण आणि शहरी भागातील लघु व्यवसायांसाठीही फायदेशीर ठरणार आहेत. (PM Modi Diwali Gift)
या घोषणेमुळे दिवाळीपूर्वी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, खरेदीचा उत्साह वाढेल आणि रोजगारनिर्मितीलाही गती मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे. त्यामुळे दिवाळीचे हे ‘गिफ्ट’ आर्थिकदृष्ट्या देशासाठी एक मोठी पायरी ठरू शकते.






