PM-KISAN | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM-KISAN) २० व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. एप्रिल ते जून २०२५ या कालावधीसाठीचा हप्ता येत्या जून महिन्यात देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत थेट जमा होणार आहे. मात्र, काही महत्वाच्या अटींची पूर्तता न करणाऱ्या शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार नाही, असा स्पष्ट इशारा कृषी विभागाने दिला आहे. (PM Kisan 20th Installment)
योजनेत सहभागी असणाऱ्या शेतकऱ्यांनी ३१ मे २०२५ पर्यंत ई-केवायसी (e-KYC), आधार लिंकिंग, बँक खात्याची तपशील अद्ययावत करणे आणि फार्मर आयडीची नोंदणी पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा २० वा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा होणार नाही.
कोणते शेतकरी वंचित राहणार? या अटींची पूर्तता आवश्यक :
शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. मोबाईल अॅप, अंगठा स्कॅन किंवा चेहरा स्कॅन करून ही प्रक्रिया करता येते. यासाठी महा ई-सेवा केंद्र किंवा स्थानिक कृषी सहाय्यकांची मदत घेता येते.
PM-KISAN पोर्टलवरून शेतकऱ्यांनी स्वतःची माहिती अद्ययावत करावी. नावात चुका, बँक खाते किंवा आधार क्रमांकातील विसंगती असल्यास त्वरित दुरुस्ती करावी.
PM-KISAN | बँक खाते व आधार सिडिंग:
शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. या प्रक्रियेअभावी DBT (Direct Benefit Transfer) चा लाभ खात्यावर जमा होणार नाही.
राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेशी एकत्रित लाभ मिळवण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे पीएम किसान योजनेच्या लाभासाठीही फार्मर आयडी तयार करून ठेवणे गरजेचे आहे. (PM Kisan 20th Installment)
जिल्हास्तरावर विशेष मोहीम; ३१ मे अंतिम मुदत :
कृषी विभागाने या अटींची पूर्तता करण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष मोहीम सुरू केली आहे. ग्रामपंचायत, तालुका कार्यालये व कृषी सहाय्यकांमार्फत शेतकऱ्यांना माहिती दिली जात आहे. पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता वेळेवर मिळावा यासाठी ३१ मे २०२५ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
जर या तारखेपर्यंत आवश्यक बाबी पूर्ण झाल्या नाहीत, तर त्या शेतकऱ्यांना २० वा हप्ता मिळणार नाही आणि नंतर ते पुढील हप्त्यापासूनच पात्र होतील. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.






