Pimpri-Chinchwad | पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील वाहन मालकांमध्ये आपल्या वाहनासाठी ‘लकी’ किंवा पसंतीचा क्रमांक घेण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. या आवडीपोटी नागरिक लाखो रुपये खर्च करत असून, यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) तिजोरीत मोठी भर पडली आहे. यंदाच्या वर्षात आतापर्यंत तब्बल ३७ कोटी रुपयांचा महसूल केवळ या फॅन्सी क्रमांकांच्या विक्रीतून जमा झाला आहे. (Pimpri-Chinchwad RTO, Fancy Numbers)
ऑनलाइन लिलाव आणि वाढती मागणी :
पसंतीच्या वाहन क्रमांकासाठीची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाइन करण्यात आली आहे. वाहनधारकांना परिवहन विभागाच्या parivahan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्या आवडत्या क्रमांकासाठी नोंदणी करता येते. एखाद्या विशिष्ट क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास, त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने बोली लावली जाते. सर्वाधिक बोली लावणाऱ्याला तो क्रमांक दिला जातो. या प्रक्रियेमुळे अनेकजण आपल्या पसंतीच्या क्रमांकासाठी, जसे की ‘०००९’, लाखो रुपये मोजायलाही तयार असतात. (Vehicle Registration)
या ऑनलाइन लिलाव प्रक्रियेमुळे आरटीओला (RTO) मोठा महसूल मिळत असून, हा त्यांच्या उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत बनला आहे. उदाहरणार्थ, ‘०००९’ या क्रमांकासाठी दुचाकीसाठी सहा हजार रुपये तर चारचाकीसाठी सात हजार रुपये मूळ शुल्क असले तरी, लिलावात त्याची किंमत कित्येक पटींनी वाढते. ही वाढती मागणी आणि क्रेझ यामुळेच आरटीओच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. (Pimpri-Chinchwad RTO, Fancy Numbers)
Pimpri-Chinchwad | महसुलाचा ३७ कोटींचा टप्पा पार :
चालू वर्षात जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत, पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) आरटीओला पसंतीच्या क्रमांकांच्या विक्रीतून तब्बल ३७ कोटी ३१ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. यासाठी एकूण २६,५७७ अर्ज दाखल झाले होते. सप्टेंबर महिना हा सर्वाधिक कमाईचा ठरला, ज्यात एकाच महिन्यात ५ कोटी २२ लाख रुपयांचा महसूल जमा झाला.
याबद्दल बोलताना पिंपरी-चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, राहुल जाधव (Rahul Jadhav) यांनी सांगितले की, “चॉईस नंबरसाठीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ३५ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला असून, यात एका नंबरसाठी ३०० पेक्षा जास्त अर्ज आले होते.” या आकडेवारीवरून वाहनधारकांमध्ये फॅन्सी क्रमांकांची आवड किती खोलवर रुजली आहे, हे स्पष्ट होते.






