Pimpri Chinchwad | पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात नुकत्याच घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका घटनेत कार आणि दुचाकीची भीषण धडक झाली, तर दुसऱ्या घटनेत एक वाळूचा डंपर उलटला. या दोन्ही अपघातांचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर वेगाने पसरत असून, ते काळजाचा ठोका चुकवणारे आहेत.
कार-दुचाकीच्या धडकेत हेल्मेटमुळे जीव वाचला
एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एक दुचाकीस्वार अत्यंत वेगाने येऊन समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक देताना दिसतो. हा आघात इतका जबरदस्त होता की, दुचाकीस्वाराचे डोके थेट कारच्या विंडस्क्रीनवर आदळले, ज्यामुळे ती काच फुटली. धडकेनंतर दुचाकीस्वार काही अंतरापर्यंत फरफटत गेला.
सुदैवाने, दुचाकीस्वाराने हेल्मेट परिधान केल्यामुळे त्याचा जीव वाचला, मात्र त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे वाहन चालवताना हेल्मेट वापरणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. हा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.
खड्ड्यामुळे डंपर उलटून मोठा अनर्थ टळला
दुसऱ्या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये, एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला आपल्या दुचाकीजवळ उभी असल्याचे दिसते. त्याचवेळी वाळूने भरलेला एक डंपर तेथून जात असताना त्याचे मागचे चाक एका खड्ड्यात किंवा ड्रेनेजच्या चेंबरमध्ये फसले आणि डंपर एका बाजूला कलंडला. धोका ओळखून त्या व्यक्तीने प्रसंगावधान दाखवत आपली दुचाकी सोडून बाजूला धाव घेतली, ज्यामुळे तो थोडक्यात बचावला. त्यानंतर डंपरचालक आणि क्लिनर खिडकीतून बाहेर पडताना दिसले.
या अपघातातून बचावलेल्या गोविंद गायकवाड (Govind Gaikwad) नावाच्या तरुणाने सांगितले की, तो आपल्या गाडीच्या कामासाठी गॅरेजवर आला होता आणि निघण्याच्या तयारीत असताना डंपरला जागा देण्यासाठी थांबला होता. त्याचवेळी डंपरचे चाक खचल्याने तो उलटणार असल्याचे लक्षात येताच त्याने बाजूला उडी मारली. स्थानिक नागरिकांच्या मते, या धोकादायक खड्ड्याविषयी महापालिकेकडे तक्रार करूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नव्हती.
महाराष्ट्र के पुणे में पिंपरी लिंक रोड पर बाइक और कार की टक्कर।#maharashtra #pune #cars #byke #accident pic.twitter.com/HrdGRObD0w
— Shivam Soni (@Shivamsoni_29) October 11, 2025






