Gopal Badhane | फलटणमधील डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली आहे. सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या या डॉक्टर तरुणीने हॉटेलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. या घटनेपूर्वी तिने आपल्या हातावरच आत्महत्येचं कारण लिहून ठेवलं होतं. या नोटमध्ये तिने पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांकडून झालेल्या अत्याचाराचा उल्लेख केला होता. याच प्रकरणात आरोपी पोलिस अधिकारी गोपाळ बदनेबद्दल (Gopal Badhane) धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी गोपाळ बदनेवर गंभीर आरोप केले आहेत. त्याच्या वर्तनामुळे अनेक महिलांना त्रास सहन करावा लागला असल्याचं सांगितलं जात आहे. रुग्णांच्या तक्रारीनुसार, तो महिलांना छेडायचा, डोळा मारायचा आणि तक्रार केल्यास उलट पैसे मागायचा, असा आरोप करण्यात आला आहे. एका महिलेनं सांगितलं की, तिच्या भाचीला त्याने डोळा मारला आणि तक्रार देण्यासाठी पैसे मागितले. पाच हजार रुपये न दिल्याने त्याने दरवाजा बंद केला, असा दावा त्या महिलेनं केला आहे.
डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येपूर्वीचे धक्कादायक खुलासे :
या प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरने आपल्या हातावरच “माझ्या मरण्याचे कारण पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने (Gopal Badhane) असून, ज्याने चारवेळा माझ्यावर अत्याचार केला, तसेच प्रशांत बनकर याने चार महिने शारीरिक व मानसिक छळ केला” असे लिहून ठेवले होते. पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यात मानसिक आणि शारीरिक त्रासासोबतच लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने हस्तक्षेप करत संबंधित पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गोपाळ बदनेला निलंबित करण्यात आले असून तो सध्या फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
Gopal Badhane | प्रशांत बनकर अटकेत, तपासाची दिशा बदलणार? :
या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रशांत बनकरला (Prashant Bankar) सातारा ग्रामीण पोलिसांनी पहाटे चार वाजता अटक केली आहे. तो पुण्यातील मित्राच्या फार्महाऊसमध्ये लपून बसला होता. पोलिसांच्या पथकांनी गुप्त माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेतलं. आत्महत्येनंतर दोन्ही आरोपी फरार होते, मात्र आता प्रशांत बनकर अटकेत आल्याने तपासाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेमुळे फलटण आणि सातारा परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. समाजातील अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.






