Prashant Bankar Arrest | सातारा जिल्ह्यातील फलटण शहर हादरवून सोडणाऱ्या डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर (Prashant bankar) याला पोलिसांनी अटक केली आहे. तो गेल्या काही दिवसांपासून फरार होता. पोलिसांनी आज पहाटे चार वाजता पुण्यातील एका फार्महाऊसमधून त्याला ताब्यात घेतलं.
सातारा ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली असून, बनकरला आज फलटण शहर पोलीस ठाण्यात आणण्यात येणार आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने अद्याप फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची स्वतंत्र पथकं कार्यरत आहेत.
हातावर लिहिलेली सुसाईड नोट :
डॉक्टर तरुणीने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर आत्महत्येचं कारण लिहिलं होतं. त्या मजकुरात तिनं स्पष्ट केलं की, “माझ्या मृत्यूसाठी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने जबाबदार आहे. त्याने माझ्यावर चारवेळा अत्याचार केला. तसेच प्रशांत बनकरने गेल्या चार महिन्यांत माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला.”
या धक्कादायक खुलास्यानंतर पोलिसांनी तत्काळ दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला. घटनेनंतर दोघेही फरार झाले होते. पोलिसांनी रात्रीपासून सापळा रचून आज पहाटे प्रशांत बनकरला अटक करण्यात यश मिळवलं.
Prashant Bankar Arrest | गोपाळ बदनेवर गंभीर आरोप; महिलांकडून तक्रारी :
दरम्यान, आरोपी गोपाळ बदनेविरोधात आणखी गंभीर आरोप समोर आले आहेत. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील काही महिलांनी त्याच्यावर छेडछाडीचे आरोप केले आहेत. “तो वारंवार महिलांना डोळा मारायचा, बोलावून त्रास द्यायचा आणि तक्रार केली की पैसे मागायचा,” असा आरोप एका नातेवाईक महिलेनं केला आहे. सध्या तो फरार असून, त्याचा तपास सुरू आहे.
या आरोपांमुळे पोलिस विभागावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. प्रकरणातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दोन्ही आरोपींवर स्वतंत्र तपास सुरू असून, सर्व पुरावे गोळा केले जात आहेत.
घटनेने महाराष्ट्र हादरला; मुख्यमंत्र्यांचा तत्काळ आदेश
ही घटना गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. फलटणमधील एका हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीचा मृतदेह आढळला. कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावला तरी प्रतिसाद न आल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी दरवाजा उघडून पाहिलं असता, तिनं गळफास घेतल्याचं दिसलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची तत्काळ दखल घेत पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितलं की, “डॉक्टर तरुणीने लिहिलेली सुसाईड नोट हा महत्त्वाचा पुरावा असून, त्या दिशेने सखोल तपास सुरू आहे.”






