Phaltan Doctor Case | फलटण शहरातील महिला डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने संपूर्ण राज्य हादरले आहे. आत्महत्येपूर्वी संपदा मुंडे (Sampada Munde) यांनी आपल्या हातावर दोन आरोपींची नावे लिहिल्याचे समोर आले होते. त्यांनी पीएसआय गोपाळ बदने याने चार वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोपही हातावरच लिहून ठेवला होता. या घटनेनंतर संपूर्ण फलटण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणात राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह एका माजी खासदाराचे नावही या प्रकरणात पुढे आल्याचे सांगितले जात आहे. आरोपी पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांना पोलिसांनी अटक केली असून कोर्टाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोस्टमार्टमनंतर धक्कादायक खुलासा :
दरम्यान, आरोपींचे वकील राहुल धायगुडे यांनी कोर्टात खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी म्हटले की, “डॉक्टर तरुणीच्या हातावर हॉटेलमध्ये कोणतीही सुसाईड नोट नव्हती, मात्र पोस्टमार्टम रूममध्ये ती नोट दिसून आली. हे कसे शक्य आहे?” हा प्रश्न आता तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतोय.
तसेच संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांनी देखील सांगितले की, हातावर लिहिलेलं हस्ताक्षर हे संपदाचे नाही. मग पोलिसांनी आरोपींना कोणत्या आधारावर अटक केली, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या दाव्यानंतर प्रकरणाला पूर्णपणे वेगळं वळण मिळालं असून तपासाची दिशा बदलण्याची शक्यता आहे.
Phaltan Doctor Case | आत्महत्या की हत्या? आंदोलनांनी पेटला बीड जिल्हा :
या प्रकरणात काहीजणांचा ठाम दावा आहे की ही आत्महत्या नसून हत्या असू शकते. कारण संपदा मुंडे या फलटणमध्ये राहत असतानाही हॉटेलमध्ये जाऊन आत्महत्या केली, ही गोष्ट संशयास्पद मानली जात आहे. घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांवरूनही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
संपदा मुंडे या अत्यंत गरीब कुटुंबातील असून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेताना घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी राहुल गांधी यांनी स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्यांच्या न्यायासाठी बीड जिल्ह्यात महिलांनी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू केले आहे.






