PSI Gopal Badhane | फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणात मोठी हालचाल झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदनेचं शेवटचं लोकेशन पोलिसांना मिळालं आहे. डॉक्टर तरुणीने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून बदने, प्रशांत बनकर (Praआणि एका खासदाराचा उल्लेख केला होता. या आरोपांनंतर गोपाळ बदने (PSI Gopal Badhane) फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध सुरू ठेवला असून त्याचे मोबाईलचे शेवटचे लोकेशन पंढरपूर परिसरात आढळले आहे.
फलटणमधील या भीषण घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. भाऊबीजेच्या दिवशी या तरुण डॉक्टरने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी तत्काळ तपास सुरू करून गोपाळ बदनेला निलंबित केलं. मात्र निलंबनानंतर तो फरार झाला आहे.
गोपाळ बदनेचा शोध पंढरपूर आणि बीड परिसरात :
गोपाळ बदने (PSI Gopal Badhane) हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळीचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या शोधासाठी सातारा आणि सोलापूर पोलिसांच्या पथकांनी पंढरपूर व बीड परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. पोलिसांकडून त्याच्या मोबाईल लोकेशनवरून हालचालींचा मागोवा घेतला जात आहे. या तपासात काही नवे धागेदोरे मिळाल्याने तपास अधिक गतीने सुरू झाला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोपाळ बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूरजवळ सापडलं असून, त्यानंतर मोबाईल स्विच ऑफ करण्यात आला आहे. त्यामुळे तो नातेवाईकांकडे किंवा सुरक्षित ठिकाणी लपल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या अनेक टीम्स बीड जिल्ह्यातील परळी भागातही शोध घेत आहेत.
PSI Gopal Badhane | नेमकं प्रकरण काय? :
सातारा जिल्ह्यातील फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने गुरुवारी (२३ ऑक्टोबर) रात्री आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी तिने हातावर लिहिलेल्या मजकुरात “पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने (PSI Gopal Badhane) याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकरने मानसिक व शारीरिक छळ केला” असे लिहिले होते. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला गेला.
डॉक्टर आणि पोलिस यांच्यातील मतभेद काही महिन्यांपासून सुरू होते. प्रशासनाकडे परस्पर तक्रारी दिल्या गेल्या होत्या. डॉक्टरने आधीच एका तपास समितीकडे गोपाळ बदनेवर गंभीर आरोप केले होते. पोलिसांकडून आरोपींच्या चौकशीदरम्यान तिच्यावर दबाव आणण्यात आल्याचंही आरोपपत्रात नमूद आहे. आता पोलिसांच्या ताब्यात प्रशांत बनकर असून, गोपाळ बदनेच्या अटकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






