शाळांत अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा; पाहा नवा निर्णय

On: February 8, 2026 6:27 PM
ZP Schools
---Advertisement---

ZP Schools | जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकेच्या शाळांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून अंशकालीन निदेशकांची नियुक्ती केली जाणार आहे. सहावी ते आठवी वर्गांची एकूण पटसंख्या 100 किंवा त्याहून अधिक असलेल्या शाळांना ही मुभा देण्यात आली आहे. कला, क्रीडा आणि कार्यानुभव या विषयांसाठी प्रत्येकी एक अशा तीन अंशकालीन निदेशकांची नियुक्ती करता येणार असल्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार पात्र ठरणाऱ्या शाळांमध्ये ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. मुख्याध्यापकांनी रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करणे बंधनकारक असून, आलेल्या अर्जांची छाननी केंद्रप्रमुखांकडून केली जाईल. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करेल. शासनाची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर गटशिक्षणाधिकारी नियुक्ती आदेश देतील आणि शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत निवड झालेल्यांची नावे शासनाकडे पाठवली जातील.

राज्यभर लागू होणार योजना :

23 ऑक्टोबर 2025 रोजी निश्चित झालेल्या पटसंख्येनुसार पात्र ठरणाऱ्या शाळांसाठी ही योजना लागू करण्यात येणार आहे. पटसंख्या वाढलेल्या शाळांमध्ये पुढील काळात निदेशकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही योजना सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये राबवली जाणार असून हजारो विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे.

या निर्णयामागील मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना कला, क्रीडा आणि कार्यानुभव या विषयांचे अधिक प्रभावी शिक्षण मिळावे, सहशालेय उपक्रमांना चालना मिळावी आणि शाळांतील गुणवत्तावाढ व्हावी. प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले की, “पटसंख्येचा निकष पूर्ण करणाऱ्या शाळांना अंशकालीन निदेशक नेमण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीकडे आहेत. या प्रक्रियेमुळे शाळांतील सहशालेय शिक्षण अधिक सक्षम होईल.”

ZP Schools | मानधनाचा तपशील काय? :

शासन आदेशानुसार 48 तासांसाठी दरमहा 12,000 रुपये मानधन दिले जाईल. त्यापेक्षा अधिक कामासाठी प्रति तास 200 रुपये अतिरिक्त मानधन देण्यात येणार असून, मासिक कमाल मर्यादा 18,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

सध्या राज्यभर साडेचार हजारांहून अधिक अंशकालीन निदेशक कार्यरत असून, पुढील वर्षी पात्र शाळांमध्ये ही संख्या वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

News Title: Part-Time Directors Appointed in ZP and Municipal Schools, Salary Up to ₹18,000 per Month

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now